दैनिक स्थैर्य । दि. १३ ऑगस्ट २०२२ । रत्नागिरी । केंद्र सरकार पुरस्कृत योजनांमध्ये जिल्ह्याने केलेले काम समाधानकारक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी केले. आज एका बैठकीत त्यांनी सर्व योजनांचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते.
येथील अल्पबचत सभागृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, भाजप जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन, माजी आमदार बाळ माने आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्ह्यात केंद्र पुरस्कृत योजना राबविणाऱ्या यंत्रणांनी आपापल्या कामाची प्रगती यावेळी सांगितली. शेतकरी वर्गास अन्न प्रक्रिया उद्योगाबाबत अधिक माहिती द्या असे मंत्री मिश्रा यांनी यावेळी सांगितले.
आयुष्यमान भारत योजना, पी.एम. किसान निधी, मुंबई-गोवा महामार्ग, रत्नागिरी प्रवासी विमानतळ, प्रधानमंत्री आवास योजना, दूरध्वनी सऐवा, एमआयडीसीतील रिफायनरी आदिंबाबत त्यांनी या बैठकीत विस्तृत आढावा घेतला.