नीरा देवघर प्रकल्पाला केंद्रीय निधी गुंतवणुकीची मान्यता; रणजीतसिंह नाईक निंबाळकरांच्या प्रयत्नांना मोठे यश

कालव्याचे काम माळशिरसच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पूर्ण होणार; उरमोडी व जिहे-कठापूर योजनेलाही निधीसाठी मान्यता


स्थैर्य, फलटण, दि. २१ ऑगस्ट : माढा लोकसभा मतदारसंघातील महत्त्वपूर्ण असलेल्या नीरा देवघर सिंचन प्रकल्पाला केंद्रीय निधी गुंतवणुकीची मान्यता मिळाल्याची घोषणा माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी केली. दिल्ली येथे झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय झाला असून, यामुळे प्रकल्पाच्या कालव्याचे काम माळशिरसच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दिल्ली येथे झालेल्या या बैठकीस राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, केंद्रीय जल आयोगाचे (CWC) चेअरमन अतुल जयंत, सदस्य पाटणकर आणि चीफ इंजिनिअर शेंगर उपस्थित होते. या मान्यतेमुळे प्रकल्पाच्या पुढील टप्प्यासाठी लवकरच केंद्रीय निधी उपलब्ध होऊन निविदा प्रक्रिया राबवण्यात येईल. यासोबतच, उरमोडी आणि जिहे-कठापूर या दोन महत्त्वाकांक्षी सिंचन योजनांनाही निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली.

या यशानंतर प्रतिक्रिया देताना माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, “२०१९ साली खासदार झाल्यानंतर सुमारे ३९०० कोटींच्या या प्रकल्पाचा केंद्रीय कृषी सिंचाई योजनेत समावेश करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. अनेक प्रशासकीय मान्यता मिळवल्यानंतर अखेर या प्रकल्पाला केंद्रीय योजनेत समाविष्ट करण्यात यश आले होते आणि आज त्यावर निधी गुंतवणुकीच्या मान्यतेचे शिक्कामोर्तब झाले.”

या यशाबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील, तत्कालीन जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मतदारसंघातील जनतेच्या वतीने आभार मानले. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वाकडे जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.


Back to top button
Don`t copy text!