कॉ. अतुल दिघे बोलताना शेजारी एन. एस. मिरजकर, प्रकाश जाधव, अविनाश खलाटे पाटील वगैरे
स्थैर्य, फलटण दि. १६ : बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट मध्ये केंद्र शासनाने केलेले बदल सहकारी बँकिंग क्षेत्राला घातक आणि जनविरोधी असल्याचे नमूद करीत त्याविरुद्ध जागृती करुन सदर धोरण बदलण्यासाठी लढा उभारण्याचे आवाहन करणारा ठराव बँक एम्प्लॉईज युनियन, कोल्हापूरच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आला.
संघटनेचे अध्यक्ष कॉ. अतुल दिघे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच संपन्न झालेल्या या वार्षिक सर्वसाधारण सभेस कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसह सुमारे २० बँकांमधील ७० हुन अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. त्यामध्ये प्रामुख्याने उपाध्यक्ष दिलीप लोखंडे, संघटक सचिव गोपाळ पाटील, माजी उपाध्यक्ष पी. आर. पाटील, अविनाश खलाटे पाटील वगैरेंचा समावेश होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडक प्रतिनिधींना या सभेस निमंत्रित करण्यात आले होते.
केंद्र शासनाचे कामगार, शेतकरी, शैक्षणिक धोरण व संघराज्य तत्वाला हरताळ फासण्याच्या धोरणांविरुद्ध लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन
केंद्र सरकारचे कामगार विरोधी धोरण व कायदे, शेतकरी विरोधी कायदे, सामान्यांच्या विरोधातील शैक्षणिक धोरण, सार्वजनिक आस्थापना व व्यवसाय विकण्याचे धोरण, राज्य घटनेतील संघराज्य या तत्वाला हरताळ फासण्याचे धोरण याविरुद्ध ठराव या सभेत करण्यात आला असून या सर्व धोरणांविरुद्धच्या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन ठरवाद्वारे करण्यात आले.
या सभेत संघटनेचे संघर्षशील कार्यकर्ते तानाजी पाटील (शिक्षक बँक कोल्हापूर), संजीव पुराणिक (अर्बन बँक सांगली), सुनील पाटील यांचा सेवनिवृत्तीबद्दल मान्यवरांचे हस्ते यथोचित सत्कार करण्यात आले. प्रा. शिक्षक बँक सातारा मधील कर्मचारी अजित मोहिते यांनी सुरु केलेल्या कामगार वार्ता या साप्ताहिकाबद्दल त्यांचा सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या.
अनुकंपा लढ्यातील महत्वपूर्ण सहभागाबद्दल एन. एस. मिरजकर व कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील अनुकंपा महिला व युवक कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
जनरल सेक्रेटरी एन. एस. मिरजकर यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन, सचिव प्रकाश जाधव यांनी कार्य अहवाल सादर केला.संघटक सचिव गोपाळ पाटील यांनी पेन्शन लढ्याबद्दलची माहिती दिली. दिलीप लोखंडे यांनी आभाराचा ठराव मांडला.