दैनिक स्थैर्य | दि. 05 फेब्रुवारी 2025 | फलटण | सातारा जिल्ह्यातील प्रमुख राजकीय व्यक्तिमत्व आणि सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी आज सकाळी ठीक ६ वाजल्यापासून केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी दाखल झाले आहेत. या धाडीमुळे राजकीय आणि व्यावसायिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सचे संस्थापक म्हणून ओळखले जातात. गेल्या काही वर्षांमध्ये गोविंद मिल्क हे विविध यशाच्या शिखरावर पोहोचले आहे, विशेषत: त्यांनी नुकतीच मध्यप्रदेशातील गुंतवणुकीच्या संधींमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
आज सकाळी ६ वाजल्यापासून श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी विविध तपास यंत्रणांचे अधिकारी दाखल झाले. त्यांनी सखोल चौकशी सुरू केली आहे, परंतु अद्याप धाड का पडली याचे कारण समोर आलेले नाही. या चौकशीत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासोबतच पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय समजले जाणारे अर्जुन देसाई यांच्या नेचर डिलाईट दूध प्रकल्पावर व देसाई यांच्या निवासस्थानी सुद्धा केंद्रीय तपास यंत्रणा दाखल झाली आहे.
श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात गोविंद मिल्कने कायद्याचे पालन करूनच कामकाज करावे यावर नेहमीच आग्रह राखला आहे. या सर्व बाबींचा विचार करता सदरील धाडीमधून काही निष्पन्न होणार नाही, असे त्यांचे विरोधक सुद्धा मान्य करतील. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी केंदीय तपास यंत्रणा दाखल झाल्यापासून सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. राजे गट व त्यांच्या विरोधी गटाचे कार्यकर्ते सुद्धा सोशल मीडियावर आक्रमक झाले आहेत. तरी कार्यकर्त्यांनी सामाजिक भान व नेत्यांच्या प्रतिमा राखणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
राज्यातील दूध प्रक्रिया उद्योगांवर विविध ठिकाणी केंद्रीय पथकांची धाड पडली आहे. संपूर्ण देशामध्ये नावाजलेली गोविंद मिल्क या कंपनीवर सुद्धा केंद्रीय तपास यंत्रणांची धाड पडली असल्याचे समजत आहे. परंतु धाड का पडली याचे कारण अद्याप समोर आले नाही, यामुळे विविध कयास बांधले जात आहेत.