स्थैर्य, फलटण, दि. २४ : हल्ली वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरे केले जातात. त्यात युवकाचा वाढदिवस असेल तर मित्रमंडळींचा जल्लोष करण्याकडे कल असतो. परंतु प्रा.पोपटराव जगदाळे यांनी मात्र सध्या कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर आपल्या शैक्षणिक मुल्यांची जपणूक करत सामाजिक जाणिवेचे भान ठेवून आपले पुत्र व कोळकी ता.फलटण येथील हॉटेल संगमचे व्यवस्थापकीय संचालक अभिषेक जगदाळे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून कोविड योध्यांचा सन्मान करुन त्यांना पी.पी.ई. किट (सॅनिटायझर,ग्लोज,मास्क) चे वाटप केले. कोळकी येथील संगम पार्क सभागृहात झालेल्या कार्यक्रमात कोरोना व्हायरसविरोधात लढा देणार्या ग्रामपंचायत कर्मचारी व अंगणवाडी सेविकांच्या कार्याला सलाम करण्यासाठी त्यांना पी.पी.ई.किटचे वाटप केले. या प्रसंगी बोलताना प्रा.पोपटराव जगदाळे म्हणाले की, आज सगळा देश कोरोना आपत्ती विरोधात लढा देत आहेत त्यात कोळकी ग्रामपंचायतीचे कर्मचारी व अंगणवाडी सेविकाही आपला जीव धोक्यात घालून यासाठी आपले योगदान देत आहेत त्यांच्या सुरक्षेचा छोटासा प्रयत्न म्हणून आपण पुत्र अभिषेक जगदाळे याच्या वाढदिवसाचे निमित्त साधून या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. अत्यंत साधेपणाने पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या प्रारंभी अंगणवाडी सेविका सौ.सुप्रिया जाधव व श्रीमती स्वाती जठार यांनी अभिषेक जगदाळे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिष्टचिंतन केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी अभिषेक यांस त्यांच्या आजी श्रीमती पद्मा मुळीक, जेष्ठ बंधू अनिकेत जगदाळे,वहिनी सौ.कोमल जगदाळे, यांचेसह जगदाळे कुटुंबिय, अंगणवाडी सेविका व कोळकी ग्रामपंचायत कर्मचारी आणि अभिषेक जगदाळे मित्रपरिवार आदिंनी अभिष्टचिंतन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.