दैनिक स्थैर्य | दि. २१ सप्टेंबर २०२४ | अकलूज |
२०२४-२५ हे वर्ष संत ज्ञानदेवांचे ७५० व्या जन्मोत्सवाचे वर्ष असून हे वर्ष ‘ज्ञानोत्सव’ म्हणून राज्यभर साजरे करावे व त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग महामंडळाच्या माध्यमातून महामार्गावर संत ज्ञानदेवांचे बोधचिन्ह व सविस्तर माहिती फलक लावावा, अशी मागणी संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांनी केंद्रिय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली.
आळंदी देवस्थान समितीचे विश्वस्त योगी निरंजननाथ आणि डॉ. भावार्थ देखणे यांनी आज केंद्रिय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेवून बोधचिन्हाचे प्रकाशन केले व त्यांच्याशी संवाद साधला.
यावेळी योगी निरंजननाथ म्हणाले, पालखी महामार्ग व पालखी सोहळा व्यवस्थापन समितीसमवेत किमान दोन महिन्यांतून एकदा राष्ट्रीय महामार्ग अधिकार्यांशी बैठक घेऊन त्यावर आढावा तयार असावा. दिवेघाटातील ज्या कार्याचे शनिवारी भूमिपूजन संपन्न झाले त्याबद्दल विस्तृत बैठक आवश्यक आहे. पालखी महामार्गावर वारकरी, वारी आणि संस्कृती संदर्भातील स्थळांची निर्मिती करावी. यंदाचे वर्ष हे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे ७५० वे जन्मोत्सवी वर्ष असल्याने त्याचे बोधचिन्ह आणि सविस्तर उल्लेख महामार्गावरील फलकांवर करावा. हे वर्ष ज्ञानोत्सव म्हणून साजरे करताना यासंदर्भात एक विशेष समारंभ संस्थान तथा महामार्ग अधिकारी यांच्या संयुक्तिक माध्यमातून व्हावा, अशी मागणी केली आहे.
याबाबत ना. नितीन गडकरी यांनी सकारात्मकता दर्शविल्याचे योगी निरंजननाथ यांनी यावेळी सांगितले.