दैनिक स्थैर्य । दि. १२ जून २०२२ । फलटण । ‘‘गेल्या वर्षभरात राजघराण्यातील श्रीमंत बाईसाहेब महाराज, श्रीमंत वसुराजे अक्कासाहेब, श्रीमंत मिनुताई साहेब यांच्यासह अनेक निकटवर्तीय कार्यकर्ते निधन पावले आहेत. तसेच राज्यात कोरोनाचा प्रार्दुभावही पुन्हा नव्याने वाढताना दिसत आहे. त्यामुळे यावर्षी आपण वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला असून माझ्या वाढदिवसादिवशी कार्यकर्त्यांनी आपापल्या गावामध्ये वृक्षारोपण करुन वाढदिवस साजरा करावा’’, असे आवाहन फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.
दि.14 जून रोजी श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस संपन्न होत असतो. वाढदिवसादिवशी फलटण शहरासह तालुक्यातील कार्यकर्ते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी करत असतात. मात्र अनेक निकटवर्तीयांच्या निधनास अद्याप वर्षही पूर्ण झाले नसल्याने वाढदिवस साजरा करणार नसल्याचे श्रीमंत रघुनाथराजे यांनी स्पष्ट केले आहे. त्या आशयाची एक फेसबुक पोस्टही त्यांनी नुकतीच प्रसिद्ध केली होती.
‘‘कार्यकर्त्यांच्या सदिच्छांचे पाठबळ कायमच आमच्या पाठीशी आहे. येत्या काळात पर्यावरणाच्या रक्षणाची चळवळ आपल्याला अधिक गतिमान करायची आहे. त्याचाच एक भाग म्हणून वृक्षारोपणाचे महत्त्व लक्षात घेवून माझ्या वाढदिवसाच्यानिमित्ताने गावोगावी वृक्षारोपणाचे कार्यक्रम आयोजित करावेत आणि प्रत्येक कार्यकर्त्याने किमान एक झाड लावून पर्यावरणपूरक वाढदिवस साजरा करावा’’, असेही आवाहन श्रीमंत रघुनाथराजे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून केले आहे.