खरीप हंगामात बोगस बि-बियाणे व खतांची विक्री होणार नाही याची दक्षता घ्यावी – पालकमंत्री बाळासाहेब पाटील

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २५ एप्रिल २०२२ । सातारा । यंदाच्या वर्षी चांगला पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी लागणारा खतांचा तसेच बि-बियाणांचा तुटवडा भासणार नाही याबरोबरच बोगस खतांची व बि-बियाणांची विक्री होणार नाही याची दक्षता कृषी विभागाने घ्यावी, असे निर्देश सहकार, पणन तथा  पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले.

खरीप हंगाम-2022 पुर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी श्री. पाटील बोलत होते. या बैठकीला खासदार श्रीनिवास पाटील, आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार महादेव जानकर, आमदार अरुण लाड, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, कोल्हापूर विभागाचे विभागीय कृषी सह संचालक बसवराज बिराजदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव शेळके आदी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, खरीप हंगामामध्ये   सोयाबीन पिकाची  मोठ्या प्रमाणात पेरणी होते. सोयाबीनला चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी बियाणांसाठी जतन केलेले बियाणे विकले आहेत. सोयाबीन बियाणांचा तुटवडा भासणार नाही याची खबरदारी कृषी विभागाने घ्यावी.  मराठवाड्यात तुर पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. त्याच पद्धतीने जिल्ह्यातही तुर पिक लागवड वाढविण्यावर कृषी विभागाने भर द्यावा, यासाठी जनजागृती करावी.

कोरोना काळात कृषी विभागाने बांधावर जावून बियाणांची उगवन क्षमता या विषयी कृषी प्रात्यक्षिके घेतली होती. अशा प्रमाणेही शेतकऱ्यांच्या बांधावर प्रात्यक्षिके घ्यावीत. तसेच खातांचा व बियाणांचा बोगस पुरवठा होणार नाही यासाठी भरारी पथके तैनात करुन कृषी  दुकानांची वेळोवेळी तपासणी करावी. तसेच कोणत्या गावात किती ऊसाची लागवड आहे याची नोंद ठेवा, अशा सूचना करुन खरीप हंगाम-2022 यशस्वी करा, असेही पालकमंत्री श्री. पाटील यांनी बैठकीत सांगितले.

खासदार श्री. पाटील म्हणाले, अनेक शेतकरी वर्षानुवर्षे एकच पिक घेत आहेत. त्यामुळे उत्पादनात घट होत आहे. कृषी सहाय्यकांनी या विषयी जनजागृती करावी. आज सेंद्रीय मालाला बाजार पेठेत चांगला दर मिळत आहेत. तरी शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीकडे वळावे.

आमदार श्री. चव्हाण म्हणाले, शेतमालाचे उत्पादन वाढवायचे असेल तर प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतातील मातीचे परीक्षण झाले पाहिजे. यासाठी प्रत्येक तालुक्यात एक माती परीक्षण प्रयोगशाळांची निर्मिती केली पाहिजे.

या बैठकीत आमदार श्री. जानकर व श्री. लाड यांनी उपयुक्त सूचना केल्या. या बैठकीला सर्व प्रांताधिकारी, कृषी विभागातील अधिकारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!