स्थैर्य, फलटण दि.26 : फलटण तालुक्यात होऊ घातलेल्या 80 ग्रामपंचायतींच्या निवडणूकीतील उमेदवारांनी आपल्या निवडणूक खर्चासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार स्वतंत्र बँक खाते उघडणे अत्यावश्यक असल्याचे माहिती, प्राधिकृत अधिकारी तथा तहसिलदार समीर यादव यांनी सांगीतले.
ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये निवडणूक लढविणार्या उमेदवारांनी निवडणूक खर्चासाठी निवडणूक आयोगाने राष्ट्रीयकृत बँक / शेड्युल बँक यामध्ये स्वतंत्र चालू / बचत खाते उघडण्याचे निर्देश दिले अहोत. काही जिल्ह्यता बँकेत स्वतंत्र खाते उघडण्याबाबत बँकांकडून सहकार्य मिळत नसल्याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे या अनुषंगाने उमेदवारांना राष्ट्रीयकृत बँक / शेड्युल बँकेसह सहकारी बँकेतदेखील स्वतंत्र बँक खाते उघडण्यास अनुमती देण्यात आली आहे. या आदेशाप्रमाणे उमेदवारांनी निवडणूक खर्चासाठी आपले स्वतंत्र बँक खाते काढून घ्यावे असे सांगून बँकांनी देखील उमेदवारांना बँक खाते उघडणेकामी सहकार्य करावे, असे आवाहनही तहसिलदार समीर यादव यांनी केले आहे.