कर्करोग जनजागृती व उपचार ही काळाची गरज – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०८ मार्च २०२२ । मुंबई । “आजची बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव पाहता महिलांमध्ये स्तन कर्करोग आजार वाढत असतांना दिसत आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी स्तन कर्करोग जनजागृती व त्यावर उपचार ही काळाची गरज आहे,” असे उद्गार वैद्यकीय शिक्षण, ग्रामविकास व क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी काढले.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्तन कर्करोग जनजागृती व उपचार रॅलीचा शुभारंभ वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. महाजन यांच्या हस्ते आज काळा घोडा येथे झेंडा दाखवून करण्यात आले. ही रॅली काळा घोडा, लायन गेट, ओल्ड कस्टम ऑफिस, एशियाटिक लायब्ररी, जनरल पोस्ट ऑफिस ते सेंट जॉर्ज रुग्णालयपर्यंत काढण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.या रॅलीत वैद्यकीय महाविद्यालयांतील २  हजार पेक्षा अधिक विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. वैद्यकीय महाविद्यालयातील युवक-युवतींनी स्तन कर्करोगाबाबत पथनाट्याद्वारे जनजागृती केली.

वैद्यकीय शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त जागतिक महिला दिनी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकचे प्र-कुलगुरू डॉ मिलिंद निकुंभ, भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार डायना एडुलजी, जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, के.जी. मित्तल महाविद्यालयाचे सल्लागार हरिप्रसाद शर्मा, प्राचार्य अजय साळुंखे उपस्थित होते.

वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. महाजन म्हणाले की, आज देशात 90 हजार महिला स्तन कर्करोग आजारामुळे मृत्यूमुखी पडत आहेत. दर सहा मिनिटाला एका महिलेचा मृत्यू या आजारामुळे होत आहे. पूर्वी हा आजार 50 ते 60 वर्षे वयोगटातील महिलांमध्ये आढळून येत होता. आज हा आजार 25 ते 40 वयोगटातील तरुण महिलांमध्ये आढळत आहे.

आयुर्वेदिक महाविद्यालयाची याबाबत खूप मोठी जबाबदारी आहे. या आजारावर घरच्या घरी निदान करण्यासाठी टाटा हॉस्पिटलच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ग्रामीण, शहरी भागात आशा वर्कर, महिला बचत गट, सामाजिक संस्थेच्या माध्यमातून याबाबत घरोघरी जाऊन जनजागृती करण्यात येणार आहे. या आजारावर उपचार करण्यासाठी शासनामार्फत प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये स्तनाच्या कर्करोगाच्या निदान व उपचारासाठी समर्पित दर बुधवारी  दु. 12 ते 2 या दरम्यान बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात करण्यात येणार आहे. इथे उपचारासाठी कुठलेही शुल्क आकारण्यात येणार नाहीत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.


Back to top button
Don`t copy text!