दैनिक स्थैर्य | दि. ६ जुलै २०२४ | फलटण |
हिंदूंना हिंसक ठरवणार्या काँग्रेसच्या राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी फलटणचे प्रांताधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांच्याकडे सकल हिंदू कृती समितीने निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात समितीने म्हटले आहे की, संसदेत नुकत्याच झालेल्या एका चर्चेदरम्यान, काँग्रसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदू समुदायाविषयी केलेल्या अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्यामुळे कोट्यवधी हिंदूंना वेदना झाल्या आहेत. त्यांनी हिंदूंना हिंसक, खोटारडे, आणि द्वेष निर्माण करणारे असे संबोधले आहे. त्यामुळे आमच्यासह देशभरातील कोट्यवधी हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे देशभर हिंदूंमध्ये एक संतापाची लाट निर्माण झाली आहे. हे वक्तव्य लोकसभेतून दूरचित्रवाहिन्यांद्वारे थेट प्रक्षेपण झाल्यामुळे जगभरातील लोकपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे जगभरात सहिष्णू हिंदू समाजाची नाहक बदनामी झाली आहे.
एका राष्ट्रीय पातळीवरील नेत्याकडून आलेले हे विधान अत्यंत अनुचित व समाजात फूट पाडणारे आहे. तसेच हिंदू समाजाविषयी देशभर घृणेचे आणि द्वेषाचे वातावरण तयार झाले आहे. या आक्षेपार्ह विधानामुळे देशातील एकतेला धक्का बसला आहे. देशातील सामंजस्य आणि शांतता यांसाठी हा एक मोठा अडथळा निर्माण झाला आहे. यावर राहुल गांधींनी जे स्पष्टीकरण दिले आहे, ते न पटणारे आहे. त्यामुळे त्यांनी हिंदू समाजाची जाहीर आणि बिनशर्त माफी मागितली पाहिजे.
राहुल गांधी यांचे लोकसभेचे सदस्यत्व तात्काळ रद्द करण्यात यावे. त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी निवेदनाद्वारे सकल हिंदू कृती समितीचे प्रशांत निंबाळकर, सचिन मोरे, प्रशांत भोसले, मंगेश खंदारे, अमोल सस्ते, आशिष कापसे यांनी केली आहे.