ना. अजित पवार आणि ना. डॉ. नितीन राऊत यांच्याकडे केली मागणी
स्थैर्य, सातारा, दि. 07 : महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने दि. ३० मार्च २०२० रोजी दिलेल्या टेरीफ ऑर्डरनुसार वीज वितरण कंपनीने दि. ०१ एप्रिल २०२० पासून राज्यातील सर्व औद्योगिक कंपन्यांवर (उच्चदाब ग्राहकांवर) केव्हीएएच (KVAID) आधारे बिलींग आकारणी सुरु केलेली आहे. ग्राहक संख्या अल्प आहे पण सर्वाधिक ४३% महसूल नियमितपणे देणारे हे ग्राहक आहेत. ही सर्व वस्तुस्थिती ध्यानी घेवून महावितरणने एप्रिल ते सप्टेंबर २०२० या ६ महिन्याच्या कालावधीसाठी केव्हीएएच (KVAH) आकारणी रदद करून पूर्वीच्या पध्दतीने KWH नुसार आकारणी करावी तसेच औदयोगिक ग्राहकांचे स्थिर आकार रद्द करून उद्योजकांना दिलासा द्यावा, अशी मागणी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे.
यासंदर्भात सातारा एमआयडीसीतील मास या संस्थेने आ. शिवेंद्रसिंहराजे याना पत्र देऊन यामध्ये लक्ष घालण्याची मागणी केली होती. उद्योजकांची समस्या सोडवण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी उपमुख्यमंत्री ना. अजित पवार आणि ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांना ईमेलद्वारे निवेदन पाठवले असून राज्यातील सर्व उद्योजकांना दिलासा देण्याची मागणी केली आहे.
जुनी केडब्ल्यूएच (KWH) युनिट्स व नवीन केव्हीएएच (KVAH) युनिट्स यामध्ये किमान सव्वा/दीडपट ते कमाल २० पट इतक्या जादा युनिटची आकारणी ग्राहकांवरझाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उदयोग बंद, कोरोनामुळे लॉकडाऊन अशा कालवधीत या ग्राकांना प्रचंड आर्थिक फटका बसलेला आहे आणि बंद कालावधीत असा फटका सहन करणे हे या ग्राहकांना शक्य होणार नाही. कोरोना जागतिक महामारीमुळे अजून अंदाजे ६० ते ६५ % उद्योग बंद आहेत. २२ मार्चला लॉकडाऊन झाल्यापासून या ग्राहकांना कोणतेही तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध नव्हते आणि आजही नाही. अजूनही सर्व उद्योग सुरु होणेसाठी किमान २/३ महिने वा अधिक काळ जाईल अशी अवस्था आहे. त्यामुळे अशा नैसर्गिक आपत्तीचा फटका सुरु असताना हा वीज बिलांचा अतिरिक्त फटका हा या ग्राहकांना अधिकच संकटात टाकणारा आहे.
राज्याची अर्थव्यवस्था रुळावर येण्यासाठी राज्यातील सर्व उद्योग लवकरात लवकर पूर्ववत सुरु होणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार विविध उपाय योजना करीत आहे. उद्योगांना थेट मदत मिळणेही आवश्यक आहे. तथापि केव्हीएएच (KVAID) बिलिंग थांबवून अनावश्यक जादा आर्थिक फटका थांबविणे हे वीज कंपनीला शक्य आहे. ग्राहक संख्या अल्प आहे पण हे ग्राहक सर्वाधिक ४३% महसूल नियमितपणे देणारे ग्राहक आहेत. ही सर्व वस्तुस्थिती ध्यानी घेवून महावितरणने एप्रिल ते सप्टेंबर २०२० या ६ महिन्याच्या कालावधीसाठी केव्हीएएच (KVAH) आकारणी रदद करून पूर्वीच्या पध्दतीने KWH नुसार आकारणी करावी तसेच औदयोगिक ग्राहकांचे स्थिर आकार रद्द करून उद्योजकांना दिलासा द्यावा, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ना. पवार आणि ना. डॉ. राऊत यांच्याकडे केली आहे.