दैनिक स्थैर्य । दि.०२ जानेवारी २०२२ । सातारा । सातारा पालिकेच्या वसुली विभागाची प्रशासक मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी शनिवारी बैठक घेऊन कर्मचाऱ्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. थकबाकीदारांना थेट वॉरंट बजवा वसुली करा अन्यथा थेट त्यांच्या मालमत्ता सील करा असे स्पष्ट आदेश मुख्याधिकाऱ्यांनी दिले.
मुख्याधिकारी बापट यांनी शनिवारी सुट्टीच्या दिवशी वसुली विभागात ठाणं मांडत सर्व वसुली कर्मचाऱ्याची बैठक घेऊन त्यांना परखड वसुली आणि महसूल वाढीच्या कठोर कानपिचक्या दिल्या. यावेळी वसुली अधीक्षक प्रशांत खटावकर, सहाय्यक अधीक्षक प्रसन्ना जाधव उपस्थित होते.
या बैठकीत बापट यांनी वसुली प्रक्रियेचा सर्वंकष आढावा घेतला. वसुली टक्केवारी अगदीच तेरा टक्क्यांवर येऊन ठेपल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत वसुली वाढविण्याचे सूचित केले. पालिकेची एकूण थकबाकी 44 कोटी असून दावे आणि अपिल यामधून दहा कोटी वसूल झाले आहेत. उर्वरीत 34 कोटीपैकी वसुली विभागाने 9 कोटी 78 लाख रुपयांची वसुली केली असून उर्वरीत 24 कोटी रूपयांपैकी जास्तीत जास्त वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. 2014 नंतर ज्या मिळकती नव्याने हद्दवाढीच्या भागासह मूळ गावठाणामध्ये उभ्या राहिल्या आहेत, त्या सर्व मिळकतींची घरपट्टीची बिले १५ जानेवारीपर्यंत तातडीने पोहोच करण्याचे आदेश बापट यांनी दिले. ज्यांची थकबाकी जास्त आहे त्यांची यादी बनवून त्यांना सोमवार पासून वॉरंट बजावण्यास सुरवात करा आणि ज्यांची थकबाकी वसूल होणार नाही त्याची प्रॉपर्टी थेट सील करा असे स्पष्ट आदेश प्रशासकांनी दिल्याने सोमवारपासून अतिरिक्त मुख्याधिकारी पराग कोडगुले यांच्या अंर्तगत पालिकेची चार पथके वसुलीसाठी बाहेर पडणार आहेत. पोवई नाक्यावरील बड्या थकबाकीदाराने किती शास्ती भरली ? तसेच संबधित व्यावसायिकाच्या कार्य क्षेत्रातील भाडेकरूंच्या स्वतंत्र नोंदी घेण्यात आल्यात का ? याची माहिती बापट यांनी बैठकीत विचारली मात्र या भागाचे लिपिक लगड हे गैरहजर राहिल्याने या प्रकरणाचा खुलासा झाला नाही.
वसुली विभागाचे अधीक्षक प्रशांत खटावकर यांची वसुली विभागातून बदली होणार असल्याची जोरदार चर्चा होती. या विभागाचा चार्ज नगराध्यक्षांचे स्वीय सहाय्यक अतुल दिसले यांना मिळणार असल्याच्या माहितीने जोर धरला आहे. मात्र, आपली बदली होणार असल्याच्या वृत्ताचे मात्र खटावकर यांनी खंडनं केले मला असे कोणतेही बदलीचे आदेश प्राप्त झाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.