दैनिक स्थैर्य । दि.१७ नोव्हेंबर २०२१ । सातारा । सातारा येथील पेढे व्यवसायिकाला गेल्या पंधरा दिवसांपासून सातत्याने आंतरराष्ट्रीय कॉल येत असून तीस लाखांची खंडणी मागितली जात असल्याची तक्रार पोलीस मुख्यालयात दाखल झाली आहे. खंडणी न दिल्यास बॉम्बने उडवून देण्याची धमकीही दिली असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याबाबतचा तक्रार अर्ज पोलीस मुख्यालयात देण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेमुळे सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
याबाबतची तक्रार साताऱ्यातील पेढे व्यवसायिक प्रशांत मोदी यांनी दिली असून त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांना गेल्या पंधरा दिवसांपासून सातत्याने आतंरराष्ट्रीय कॉल येत आहेत. तीस लाख रुपये दे, अन्यथा बॉम्ब लावून उडवून देईन, अशी धमकी यातून देण्यात येत आहे. या धमकीकडे सुरुवातीला मोदी यांनी दुर्लक्ष केले. मात्र, रात्री अपरात्री कॉल करणे, मेसेज करणे आणि पैस न दिल्यास धमकावणे असे प्रकार सुरुच राहिले होते. जवळपास दहा ते बारा कॉल आल्यामुळे आणि सतत धमकावले जात असल्याने मोदी यांनी सातारा पोलीस मुख्यालयात याची तक्रार दिली.
मोदी यांनी दिलेल्या तक्रार अर्जात त्यांच्या मोबाईलवर आलेले कॉल नंबर, मेसेज याचे स्क्रीन शॉटदेखील जोडले आहेत. या धमकींमुळे माझ्या जिवीताला धोका निर्माण झाला असून दोन नंबर वरुन एकाच प्रकारची धमकी दिली जात असल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे.