दैनिक स्थैर्य । दि.१२ फेब्रुवारी २०२१ । सातारा । फायनान्स कंपन्यांकडून कर्जावर घेतलेल्या ट्रक्सचे हप्ते थकल्यानंतर, ते खरेदी करण्याच्या बहाण्याने नोटरी करून, ट्रक्स घेऊन मूळ मालकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश सातारा शहर पोलीसांनी केला आहे. या टोळीने महराष्ट्र, गुजरातमध्ये अनेकांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन कोटी रुपयांची 24 वाहने जप्त केल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी शुक्रवारी दिली.
अप्पर अधीक्षक अजित बोऱ्हाडे, साहाय्यक अधीक्षक आँचल दलाल, पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ उपस्थित होते.
याबाबत बन्सल यांनी दिलेली माहिती अशी, साताऱ्यातील इंडो स्टार कॅपिटल फायनान्सकडून सचिन बजरंग चव्हाण (रा. एकंबे, ता. कोरेगाव) यांनी दहाचाकी ट्रक कर्जाने घेतला होता. त्याचे हप्ते थकले होते. त्यामुळे फायनान्स कंपनीकडे एजंट म्हणून काम करणाऱ्याच्या ओळखीने, उन्मेश उल्हास शिर्के (रा. नीरा, ता. पुरंदर, जि. सातारा) याने थकीत हप्ते भरून आणि ठरावीक रक्कम चव्हाण यांना देऊन हा ट्रक चालवायला घेतला होता. त्यानंतरही ट्रकचे हप्ते थकल्याने चव्हाण यांनी शिर्केला हप्ते भरायला सांगितले; परंतु तो वारंवार टाळाटाळ करून उडवाउडवीची उत्तरे देत होता. पैसे भरत नाही व ट्रकदेखील देणार नाही, अशी दमबाजी त्याने केली. अखेर चव्हाण यांनी आपली फसवणूक झाल्याची फिर्यादी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलिसांनी उन्मेश शिर्के व अब्दुल कादीर सय्यद (रा. सुपा, ता. पारनेर, जि. अहमदनगर) यांना अटक केली. या गुन्ह्याच्या तपासात संशयितांनी 45 लोकांना असाच गंडा घातल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी संशयितांची कसून चौकशी केली असता, सातारा, पुणे, मुंबई, सोलापूर, अहमदनगर, बीड, औरंगाबाद, बुलढाणा, पनवेल, ठाणे, रायगड, सांगली, गोवा, गुजरातमधील लोकांची फसवणूक केल्याचे सांगितले. संशयितांनी फसवणूक करून नेलेले 14 ट्रक, सात टाटा मॅजिक (छोटा हत्ती), एक टाटा सुमो, अशी दोन कोटी 45 लाख 65 हजार रुपयांची वाहने जप्त केली आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर, पोलीस निरीक्षक वंदना श्रीसुंदर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक समीर कदम, हवालदार राहुल घाडगे, सुजीत भोसले, दीपक इंगवले, अविनाश चव्हाण, ज्योतिराम पवार, पंकज ढाणे, अभय साबळे, विक्रम माने, अरुण दगडे यांनी ही कारवाई केली.