स्थैर्य, फलटण: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस. टी.) फलटण आगारातून सुमारे दोन अडीच महिन्यांच्या खंडानंतर सातारा, लोणंद आणि आसू मार्गावर प्रवासी वाहतूक सुरु करण्यात आली असून दहिवडी मार्गावर सुरु करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगतानाच सुरु करण्यात आलेल्या या मार्गावर पुरेसे प्रवासी नसल्याने हे मार्ग तोट्यात सुरु असल्याचे प्रभारी आगार व्यवस्थापक राहुल कुंभार यांच्याशी चर्चा करताना स्पष्ट झाले आहे.
दरम्यान अद्याप जिल्ह्याबाहेर प्रवासी वाहतुकीस परवानगी देण्यात आली नसल्याने पुणे, बारामती, पंढरपूर, सोलापूर, सांगली मार्गावरील प्रवासी वाहतूक सुरु करता आली नाही. एस. टी. माध्यमातून माल वाहतूक करण्याचा निर्णय झाला असून त्यासाठी वेगळ्या प्रकारची वाहने महामंडळाने उपलब्ध करुन दिली असून सातारा येथून माल वाहतूक सुरु झाली आहे, लवकरच फलटण आगारातूनही माल वाहतूक सुरु करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे कुंभार यांनी निदर्शनास आणून दिले आहे.