
एलसीबीची कारवाई : 4.11 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
स्थैर्य, सातारा, दि. 14 : घरफोडीत चोरलेले दागिने विकण्यासाठी आलेल्या दोन संशयीतांना सातारा स्थानिक गुन्हे शाखेने फलटण येथे सापळा रचून शिताफीने पकडले. त्यांच्याकडून 4 लाख 11 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
याबाबत माहिती अशी, बारामती जि. पुणे बाजुकडून टाटा छोटा हत्ती वाहनातून (एमएच 10 एक्यू 680) दोघेजण चोरीचे दागिने विक्रीकरीता घेवून येणार असल्याची माहिती एलसीबीला मिळाली. त्यानंतर एलसीबीचे सपोनि आनंदसिंग साबळे यांच्या पथकाने सोमवार पेठ, फलटण येथे बारामती रोडलगत कॅनोलवरील पुलावर सापळा रचला. यावेळी संबधित टाटा एस छोटा हत्ती गाडी त्याठिकाणी आली. पोलिस पथकाने गाडी थांबवून आतील दोन संशयीतांची झडती घेतली असता त्यांच्याकडे 37 ग्रॅम 960 मिलीचे सोन्याचे गंठण पेन्डलस त्यास डायमंडमधील डिझाईन, एक तोळ्याचे स्पेशल सोन्याचे नेकलेस गोल पेन्डलसह त्यात डायमंडमधील डिझाईन, 2 तोळे 22 ग्रॅमच्या दोन सोन्याच्या बांगड्या, एक ग्रॅमचे कानातील दोन सोन्याचे टॉप्स्, 4 ग्रॅमचे एक सोन्याचे बिस्कीट, 7 ग्रॅमची चांदीची खड्याची अंगठी, 4 ग्रॅम 340 मिली दोन चांदीचे पायाचे बोटातील बिछवे असे एकूण सोने 77 ग्रॅम 75 मिली रुपयांचा 2 लाख 33 हजारांचे सोन्याचे दागिने व 13 हजारांचे चांदी 12 ग्रॅम 24 मिली चांदीचे दागिने असा 2 लाख 46 हजारांचा ऐवज मिळून आला. या दागिन्यांबाबत चौकशी केली असता संशयीतांनी सुरुवातीला उडवाडडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्यांची कसून चौकशी करता त्यांनी फलटण शहरामध्ये मार्च महिन्यामध्ये चोरी केली असल्याचे सांगीतले.
संशयीताने सांगितल्यानुसार पोलिसांनी खात्री केली असता याबाबतचा गुन्हा फलटण पोलिस ठाण्यात दाखल होता. यानंतर पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेले वाहन व सोन्या-चांदीचे दागिने असा मिळून 4 लाख 11 हजार 190 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. जप्त मुद्देमालापैकी सोन्याचे नेकलेस, सोन्याच्या दोन बांगड्या, चांदीची अंगठी व पायातील बिछवे यांचे मालक मिळुन आले नाहीत. तथापि, फलटण भागातील ज्यांच्या घरी चोरी झालेली आहे त्यांनी या मुद्देमालाबाबत खात्री करुन घ्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक धिरज पाटील यांनी दिलेल्या सूचना नुसार व एलसीबीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरिक्षक आनंदसिंग साबळे, पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जहाड, सहा.पोलीस फौजदार ज्योतीराम बर्गे, उत्तम दबडे, पो. हवा सुधीर बनकर, मुबीन मुलाणी, विनोद गायकवाड, पो.ना. शरद बेबले, मोहन नाचन, संतोष जाधव, प्रवीण फडतरे, मुनीर मुल्ला, गणेश कापरे, पो. कॉ. विक्रम पिसाळ, वैभव सावंत, केतन शिंदे, अनिल खटावकर, चालक संजय जाधव, विजय सावंत, म पो. कॉ. विद्या पवार, तनुजा शेख, तसेच फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोउनि विशाल भंडारी व पोना नितीन भोसले यांनी केली.