दैनिक स्थैर्य । दि. ११ मार्च २०२२ । फलटण । भारतीय मानक ब्यूरो या संस्थेचा ग्राहक चळवळीत कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांसाठी आयोजित केलेला कार्यशाळेचा उपक्रम स्तुत्य आहे. भारतीय मानक ब्यूरो या संस्थेने अशा कार्यशाळांचे जिल्हानिहाय व्यापक स्वरुपात आयोजन करावे अशी अपेक्षा ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे राज्याध्यक्ष डॉ. विजय लाड यांनी व्यक्त केली.
भारतीय मानक ब्यूरोच्या पुणे येथील शाखेत ग्राहक चळवळीत कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांसाठी या संस्थेच्यावतीने प्ले स्टोअरवरील ‘बीआयएस केयर’ या ॲपची व वेबसाईडची माहिती देणार्या कार्यशाळेचे आयोजण करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे राज्य सचिव अरुण वाघमारे, भारतीय मानक ब्यूरोचे पुणे शाखेतील वैज्ञानिक सी मयंक शुक्ला, नीशा कणबर्गी, वैज्ञानिक ई हेमंत आडे, पुणे विभागाच्या अध्यक्षा सौ. सुनिता राजेघाटगे, विद्युत नियामक आयोग ग्राहक तक्रार निवारण केंद्राचे बारामती विभागाचे ग्राहक प्रतिनिधी श्रीकांत बावीस्कर, पुणे कार्यकारीणीच्या सौ. मनिषा गायकवाड, सातारा जिल्हा संघटक किरण बोळे, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख रंगराव जाधव आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
भारतीय मानक ब्यूरो या संस्थेच्या पुणे कार्यालया अंतर्गत बारा जिल्ह्यांचा समावेश आहे. या संस्थेने ग्राहक हा तीसरा डोळा असून तो उघडण्यासाठी विस्तृतपणे जनजागृती करावी, यामध्ये ग्राहक पंचायत महाराष्ट्र आपल्या खांद्याला खांदा लावून काम करेल अशी ग्वाही डॉ. लाड यांनी यावेळी दिली. शालेय विद्यार्थ्यांमध्ये ग्राहक हक्काबाबतची जागृती होणे अत्यावश्यक आहे, कारण आजचे विद्यार्थी उद्याचे सजग नागरिक आहेत. त्यामुळे जिल्हानिहाय तेथील जिल्हाअधिकार्यांच्या माध्यमातून अशा कार्यशाळा आयोजित होणे अपेक्षित असल्याचेही डॉ. लाड यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी कार्यशाळेत हेमंत आडे यांनी आयएसआय मार्क, ॲगमार्क, होलमार्क, एचयूआयडी व ईलेक्ट्रॉनिक्स वस्तूवर असणार्या मानकांची आवश्यकता व महत्व पटवून दिले. मयंक शुक्ला व नीशा कणबर्गी यांनी भारतीय मानक ब्यूरोच्या ‘बीआयएस केयर’ या ॲपची व बेवसाईडची प्रत्यक्षपणे प्रात्यक्षिकाद्वारे विस्तृत माहिती दिली व कार्यकर्त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्न व शंकावर समाधानकारक मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास पुणे, सातारा, सोलापूर, नांदेड आदी जिल्ह्यातील ग्राहक चळवळीत कार्यरत असलेल्या संस्थांचे कार्यकर्ते, प्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते.