स्थैर्य, वाई, दि.२६: वाई येथील रविवार पेठ, पेटकर कॉलनी येथील अभिजीत लोखंडे याच्या घरासमोर टोळी युद्धाच्या वर्चस्वातून लाठ्या-काठ्यांच्या मारामारी व गोळीबार प्रकरणी आज फरारी असलेला अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव (रा. भुईंज) याला वाई पोलिसांनी ताब्यात घेतले.
दिनांक 13 मे 2020 रोजी रात्री रविवार पेठ पेटकर कॉलनी येथील अभिजित लोखंडे यांच्या घरासमोर वाई मांढरदेव रस्त्यावर अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव व सोन्या मोरे (रा गंगापुरी) यांनी सहकार्यांसह मोटारीतून येऊन लाठ्या-काठ्यांनी मारामारी करून गोळीबार केला होता. यामध्ये काही जण जखमी झाले होते. टोळी युद्धातील वर्चस्वाच्या वर्चस्व वादाच्या भांडणातून गोळीबार झाला होता. यावेळी दहशत माजविण्याचा उद्देशाने गोळीबार करण्यात आला होता. याप्रकरणी आठ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या तपासात इतर सर्व आरोपींना अटक करण्यात आली होती. बंटी जाधव फरारी होता. त्याला आज वाई पोलिसांनी या गुन्ह्याच्या चौकशीकामी ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची 30 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. गुन्हे शाखेच्या सहायक उपनिरीक्षक विजय शिर्के, कृष्णराज पवार, किरण निंबाळकर आदी त्याची चौकशी करणार आहेत. अधिक तपास पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे करत आहेत.