दैनिक स्थैर्य । दि. २४ सप्टेंबर २०२१ । लोणंद । लोणंद येथील लक्ष्मी प्लाझा मधे लक्ष्मी गोल्ड नावचे ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाच्या दिवशीच 9 सप्टेंबर रोजी एक पुरुष व महिला जोडगोळीने हातचलाखी करत दुकानातील सुमारे 1 लाख 86 हजार रुपयाचे दागिने चोरी करुन पसार झाले होते. याप्रकरणी लोणंद पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्हयातील दोन्ही आरोपींस लोणंद पोलीसांनी बेड्या ठोकत जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.
लोणंद येथील लक्ष्मी गोल्ड या नवीन ज्वेलर्सच्या उद्घाटनाच्या दिवशीच एका जोडप्याने बंटी बबली स्टाईल हातचलाखी करत 1 लाख 86 हजारांच्या सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारून पोबारा केल्याची घटना घडली होती. याप्रकरणाची गंभीर दखल घेत लोणंद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल के. वायकर यांनी आपल्या सहकार्यांसह कौशल्यपूर्ण तांत्रिक तपास करत पुणे येथून जोत्स्ना सुरज कछवाह वय 29 वर्षे रा.आंबेगाव खु. पुणे व निलेश मोहन घुते वय 34 वर्षे रा. गुजरवाडी फाटा , कात्रज पुणे अशा दोन सराईत भामट्यांना चोरीचा माल व चोरीसाठी वापलेली वॅगनर कार सह चतुर्भुज करण्यात यश मिळवले.
या गुन्ह्याचा तपास अजयकुमार बन्सल पोलीस अधिक्षक सातारा, धिरज पाटील अप्पर पोलीस अधिक्षक सातारा, तानाजी बरडे उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांचे मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे विशाल वायकर सहायक पोलीस निरीक्षक, गणेश माने पोलीस उपनिरीक्षक, स्वाती पवार महीला पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस नाईक संतोष नाळे, श्रीनाथ कदम, अभिजीत घनवट, फैय्याज शेख, अविनाश शिंदे, अमोल पवार, केतन लाळगे, गोविंद आंधळे तसेच महीला पोलीस अंमलदार वैशाली नेवसे, प्रिया नरुटे यांनी सहभाग घेतला.