दैनिक स्थैर्य । दि. ११ ऑगस्ट २०२२ । पुणे । “बुद्धाचा देश म्हणून भारताला जगभरात ओळखले जाते. त्यांच्या विचारांचे पाईक असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला समृद्ध राज्यघटना दिली. त्यात स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या तत्वांचा, विचारांचा अंतर्भाव केला. हाच बुद्धाचा आणि बंधुतेचा विचार जगाला शांतीचा मार्ग दाखवेल,” असे मत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे पुणे विभागीय संचालक प्रा. डॉ. गौतम बेंगाळे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद पुणे आणि रयत शिक्षण संस्थेचे मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘क्रांतिदिनी’ आयोजिलेल्या नवव्या विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलनाच्या समारोपात प्रा. डॉ. गौतम बेंगाळे यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत पुरस्कार’ जलतज्ज्ञ अनिल पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. प्रसंगी संमेलनाध्यक्ष प्राचार्य डॉ. के. जी. कानडे, राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद पुणेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे, महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. बाळासाहेब गार्डी आणि परिषदेचे मुख्य कार्यवाह प्रा. प्रशांत रोकडे आदी उपस्थित होते.
प्रा. डॉ. गौतम बेंगाळे म्हणाले, “कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या संस्थेत होत असलेल्या संमेलनात मला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने प्रज्ञावंत पुरस्कार मिळणे आनंदाची बाब आहे. गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासारख्या महानुभावांच्या विचारांना आपल्या कृतीत उतरवण्याची गरज आहे. देशात नालंदासारखे शैक्षणिक संकुल पुन्हा उभारण्यासाठी लॉर्ड बुद्ध आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा प्रस्ताव सरकारसमोर मांडलेला आहे.”
अनिल पाटील म्हणाले, “पाणी हा आजघडीचा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. पिण्यासाठी, शेतीसाठी मुबलक पाणी मिळणे गरजेचे असताना देशाच्या, राज्याच्या अनेक भागात पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ सामान्यांनवर येते. त्यामुळे पाणी चळवळ प्रभावीपणे राबवण्याची गरज आहे. पाणी क्षेत्रात दुसरी जलक्रांती होण्याची गरज आहे. सामान्य माणसाने जागृत होण्याची गरज आहे. त्यासाठी बंधुतेच्या व्यासपीठावरून जागृती व्हावी. पाण्याचे योग्य व्यवस्थापन व्हायला हवे. प्राध्यापकांनी पर्यावरण, जल यासर्वांचा अभ्यास करणे गरजेचे आहे.”
बंधुताचार्य प्रकाश रोकडे म्हणाले, “डॉ. बेंगाळे यांचे कार्य बाबासाहेबांच्या विचारांचे आहे. चांगल्या क्षेत्रातील माणसांना एकत्र आणण्याचे काम आपल्याला करायचे आहे. बंधुतेचा विचार हाच जगात बंधुभाव पेरणार आहे. ज्ञानदानाचे काम करणाऱ्या शिक्षकांनी याचे महत्व समजून घेतले पाहिजे.
प्रा. डॉ. बंडोपंत कांबळे (औंध), प्रा. व्ही. बी. फसाले (मंचर), प्रा. एस. टी. पोकळे (मंचर), प्रा. के. बी. एरंडे (मंचर), अंबादास रोडे (मुळशी), प्रीती जगझाप (चंद्रपूर), संदीप राठोड (निघोज), चंदन तरवडे (कोपरगाव), विद्या गायकवाड (अहमदनगर) आणि महेश भोर (मंचर) या शिक्षकांना बंधुता गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रा. डॉ. के. जी. कानडे यांनीही मनोगते व्यक्त केली. शंकर आथरे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. बाळासाहेब गार्डी यांनी आभार मानले.