दैनिक स्थैर्य । दि. १४ मार्च २०२२ । सातारा । सहकार मोडून खाणारे दुतोंडी सातारा विकास आघाडीच्या च कामाचे अभिनंदन करत आहेत . जर तुमच्याकडे पाहून जर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निधी दिला असेल तर एखाद्या दुसऱ्या कामासाठी का ? मतदार संघाच्या सगळ्याच कामांसाठी तुम्ही वारंवार अजितदादांना तोंड दाखवा आणि निधी आणा असा उपरोधिक टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रसिंहराजे यांना लगावला आहे .
साताऱ्यात सध्या भाजपच्या दोन खासदार व आमदारांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुरा सुरू आहे . आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा जिल्हाला निधी दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले . त्यांच्या या आभार सत्राचा उदयनराजे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे .
उदयनराजे पुढे म्हणाले यांनी चांगल्या कामांकडे बघुन सातारकरांनाच नव्हे तर सर्वांनाच भरभरुन दिले आहे. त्यांचे लोकदायित्व ते पार पाडत आहेत. परंतु तुमचे तोंड बघितल्यावर अजित पवार यांनी पैसे दिले असा डांगोरा ते पिटत आहात. तुम्ही तुमचा मुखडा दाखवल्याने अजित पवार यांनी निधी दिला हे जर खरे असेल तर फक्त एखाद-दुस-या कामासाठीच तुम्ही तुमचे सुमूख दाखवले. सातारकरांसाठी अधिक वेळा तुमचे मुख त्यांनी दाखवून, अजित दादांकडून अधिक कामे-निधी का मंजूर करुन घेतली नाहीत, असा प्रश्न खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे. दुतोंडी आणी बाजारबुणग्यांची कुजकट दुर्गंधी युक्त घाण यापूर्वीच सातारकरांनी पालिकेतुन बाहेर काढून दूर फेकून दिली आहे. त्यावेळी ‘नाक कापले तरी भोके आहेत’ असे म्हणत वर तोंड करुन ते फिरत आहेत. हे दुटप्पी राजकारणी साविआच्या कामाचे अभिनंदन करुन आपणच निधी आणला अशा अविर्भावात आहेत.
प्रशासकीय इमारतीचे भुमीपूजन कसे केले, वर्क ऑर्डर आहे का, असले नकारात्मक प्रश्न ज्यांनी उभे केले, तेच आज प्रशासकीय इमारतीसाठी रुपये १० कोटी मिळाल्याबद्दल अभिनंदन करीत आहेत. गेल्या पाच वर्षात एक तरी मोठे काम दाखवा असे काल पर्यंत केकाटणारे, आज ग्रेड सेपरेटर आम्ही केला, प्रशासकीय इमारत चांगली होईल, असे भाष्य करीत आहेत. गेल्या पाच वर्षात साविआने सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून लोकहिताची कामे केली आहेत. त्यांच्याकडे ४० वर्षे सत्ता असताना जे काही व्हायला पाहिजे ते कधीच झाले नाही. त्यामुळे साविआने केलेल्या कामांचा धसका घेवून, दुतोंडी भुमिका त्यांना घ्यावी लागत आहे, असा टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी लगावला आहे.
आता हे फुकटचे फौजदार १० कोटींबद्दल संबंधीत मंत्री महोदयांचे इतक्या उशीरा आभार-अभिनंदन करीत आहेत. म्हणजे ‘बैल गेला आणि झोपा केला’ अशी त्यांची अवस्था आहे. यांना जनतेशी काहीही देणेघेणे नाही. जनतेच्या तव्यावर आपल्या पोळया भाजुन घ्यायच्या आहेत. सहकारी संस्था झाल्या, कारखाना चावून-चावून दात आणि कारखाना दोन्ही बोथट व्हायला लागलेत. आता सभासद जागा होत असल्यामुळे दुसरे आयते कुरण म्हणून ते निव्वळ स्वार्थासाठी पालिकेकडे पहात आहेत.