दैनिक स्थैर्य | दि. 10 डिसेंबर 2024 | सातारा | कुसवडे (ता. सातारा) येथील एका युवकाकडून लग्न होण्यासाठी पैसे घेऊन लग्नाच्या दुसर्याच दिवशी दागिन्यांसह नवरी पसार झाल्याने त्या युवकाने आपली फसवणूक झाल्याची तक्रार बोरगाव (ता. सातारा) पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. ही घटना वर्षभरापूर्वी घडली असून हा युवक वर्षभर नवरीला परत आणण्यासाठी प्रयत्न करत होता. मात्र, नवरी परत न आल्याने या युवकाने ७ डिसेंबर रोजी रात्री अखेरीस दागिने व रोख रक्कम अशी एकूण चार लाख ७० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार लग्न लावून देणार्या चौघा जणांच्या टोळीविरोधात बोरगाव पोलिस ठाण्यात दिली आहे. बोरगाव पोलिसांनी या टोळीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
वर्षा सुंदरसिंग ठाकूर (मु. पो. तळणी, ता. सिल्लोड), जान्हवी जयेश सोळंके (रा. सिडको स्कीम, खोतकरवाडा, संभाजीनगर), ताराचंद पुंडलिक आघाणी (रा. पेरणे, ता. हवेली, जि. पुणे) व श्रीकांत शिंदे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
संशयितांनी मुलाचे लग्न ठरवून देतो, असे म्हणत मुलाचा व घरच्यांचा विश्वास संपादन केला होता. त्यातून १६ ऑक्टोबर २०२३ ला एरंडोली (ता. मिरज, जि. सांगली) येथे मुलगी दाखविण्याचा कार्यक्रम झाला. मुलगी पसंत असल्याचे सांगितल्यावर संशयितांनी त्याचदिवशी लग्न करण्याचा आग्रह केला, तसेच लग्न लावायचे असल्यास दोन लाख रुपये देण्याची मागणीही केली.
त्यांच्या आग्रहामुळे त्यांनी क्षेत्र माहुली येथील संगम मंगल कार्यालयात मुलाचे वर्षा हिच्याशी लग्न लावले. लग्नाच्या वेळी संशयितांनी मुलाकडून दोन लाख रुपये घेतले होतेच; परंतु लग्न झाल्यावर मुलीला घरी घेऊन जायचे असल्यास आणखी ६० हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केली. त्यामुळे मुलाने नाईलाजाने या संशयितांना ६० हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने दिले. त्यानंतर मुलाचे कुटुंबीय मुलीला घेऊन गावी गेले. दुसर्याच दिवशी १७ ऑक्टोबरला वर्षा दुपारी दोनच्या सुमारास जान्हवीसोबत निघून गेली.
जाताना नवरीने लग्नात घातलेल्या सोन्याच्या पाटल्या, मंगळसूत्र, गंठण, कर्णफुले, नथ, तसेच पैंजण व जोडवी असे सुमारे १ लाख ७० हजार रुपयांचे दागिने घेऊन गेली. तेव्हापासून मुलगा संशयितांकडून मुलीला पाठविण्याची विनंती करत होता; परंतु त्यांनी तिला परत पाठविले नाही, तसेच वर्षाने दुसरे लग्न केल्याचे जान्हवीने त्याला सांगितले. त्यानंतर मुलाने सखोल चौकशी केली. तेव्हा संशयितांचे एकमेकात कोणतेही नाते नसल्याचे, तसेच कुटुंबातील लोकांचा विश्वास संपादन करून त्यांनी फसवणूक केल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे लग्न ठरत नसलेल्या मुलांना फसविणार्या या टोळीबाबत त्याने काल रात्री बोरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निकम तपास करत आहेत.