स्थैर्य, सातारा, दि. 30 : ग्वाल्हेर-बेंगलोर आशियाई महामार्गावर पाटेश्वरनगर बोरगाव) ता. सातारा गावच्या हद्दीत चाकूचा धाक दाखवून ट्रक चालकास लुटणाऱ्या चोरट्यांचा बोरगाव पोलिसांनी शिताफीने तपास करून दहा दिवसांतच त्यांना जेरबंद करण्यात यश मिळविले.
ताब्यात घेतलेल्या तीन चोरट्यांपैकी दोघे अल्पवयीन असून अनिकेत चंद्रकांत जाधव (वय.१९, रा.कातकरी वस्ती, सदरबाजार, सातारा) असे तिसऱ्या संशयितांचे नाव आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीसह ६३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. या जबरी चोरीची फिर्याद ट्रक चालक रेहमान खुदबुद्दीन नदाफ (रा.संजयनगर,सांगली) यांनी दिली होती. याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवार १९ मे रोजी ट्रकचालक रेहमान नदाफ हा मुंबईहून शेतीची औषधे आयशर ट्रकमध्ये भरून सांगलीकडे एकटाच निघाला होता. रात्री ८.३० च्या सुमारास लघुशंकेसाठी तो महामार्गावरील पाटेश्वरनगर (बोरगाव) येथे थांबला. लघुशंका करून तो पुन्हा ट्रक मध्ये बसला असता अचानक पाठीमागून एका दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांची दुचाकी ट्रकला आडवी लावली. दुचाकीवरील दोघे ड्रायव्हर बाजूने व एक क्लिनर बाजूने ट्रकमध्ये घुसले. त्यांनी चालकाकडे दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली. चालकाने पैसे देण्यास नकार दिल्यावर त्यापैकी एकाने खिश्यातून चाकू काढून चालकाजवळील ६ हजार रुपये असलेले पैश्याचे पाकीट व मोबाईल काढून घेतला. या वेळी झालेल्या झटापटीत ट्रकचालकाच्या हातावर त्यांनी चाकूने वार करून गंभीर जखमी करून हे तिघे चोरटे दुचाकीवरून पसार झाले. या घटनेची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात झाली होती.या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील व सहायक पोलिस उपअधीक्षक समीर शेख यांनी पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या. तांत्रिक तपास व गोपनीय माहितीवरून तपास करत बोरगाव पोलिसांनी केवळ दहा दिवसातच या हायवे रॉबरीचा उलगडा करत या गुन्ह्यात सामील असलेल्या दोन अल्पवयीन मुलांसह अनिकेत चंद्रकांत जाधव याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक दुचाकी, दोन मोबाईल असा ६३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही अल्पवयीन संशयितांना पोलिसांनी शुक्रवारी बाल न्यायालयात हजर केले. तर अनिकेत जाधवला अटक करण्यात आली आहे.
सहायक पोलिस निरीक्षक डॉ. सागर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळींबकर, हवालदार मनोहर सुर्वे, स्वप्नील माने, विजय साळुंखे, किरण निकम, राहुल भोये, विशाल जाधव व प्रकाश वाघ हे तपासकामी सहभागी होते.