दैनिक स्थैर्य | दि. १६ सप्टेंबर २०२३ | फलटण |
वंदे मातरम् संघटना, पुणे व श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ ट्रस्ट, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी ‘पुस्तक दहिहंडी’ कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. त्याअनुषंगाने यंदाच्या ‘पुस्तक दहिहंडी’ कार्यक्रमात श्री. छत्रपती शिवाजी वाचनालय, फलटण या संस्थेस १५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल १३० नामांकित पुस्तकांचा संच देणगी स्वरूपात देण्यात आला.
या देणगीबद्दल श्री छत्रपती शिवाजी वाचनालय, फलटण या संस्थेचे अध्यक्ष अॅड. अजित शिंदे, सचिव श्रीकृष्ण देशपांडे, सदस्य रवींद्र बर्गे, विलास बोरावके, रवींद्र फौजदार, महेश साळुंखे, सुभाष भांबुरे, विजयकुमार लोंढे-पाटील, तुषार नाईक निंबाळकर यांनी वंदे मातरम् संघटना, पुणे व श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ ट्रस्ट, पुणेचे संचालक श्री. गणेश उर्फ गिल्लू देशपांडे यांचे आभार मानले आहेत.
पुण्याची वंदे मातरम् संघटना व श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ ट्रस्ट ‘पुस्तक दहिहंडी’सारखे समाजाला दिशा देणारे काम करीत असल्याबद्दल त्यांचे कौतुक श्री छत्रपती शिवाजी वाचनालयातर्फे करण्यात आले आहे.