
![]() |
फलटण : नायब तहसीलदार आर.सी.पाटील यांना जय मल्हार क्रांती संघटना यांच्यावतीने निवेदन देताना पदाधिकारी. |
स्थैर्य, फलटण दि.२ : रामोशी बेरड, बेडर समाज शासनाच्या विकासात्मक व कल्याणकारी योजनांपासून दूर राहिल्याने सामाजिक शैक्षणिक, सांस्कृतिक आर्थिक दृष्ट्या मागास राहिला असून रामोशी समाजाच्या विविध मागण्यांसाठी जय मल्हार क्रांती संघटना फलटण शाखेच्यावतीने तहसीलदार कार्यालयावर आज सोमवार दि. 2 नोव्हेंबर रोजी बोंबाबोंब आंदोलन करुन नायब तहसीलदार आर. सी. पाटील यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्रात बेरड व रामोशी समाजाची लोकसंख्या जवळपास 25 ते 30 लाख आहे. बेरड, बेडर, नायका, तलवार, वाल्मिकी, रामोशी या सर्व जाती एकच आहेत ही बाब वेगवेगळ्या मानववंश शास्त्रीय संशोधनातून व विविध आयोग आणि गठीत केलेल्या समित्या यांच्या अहवालावरुन स्पष्ट झाली असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आदेश (सुधारणा) कायदा 1976 नुसार बेडर ही जमात जी बेरड, रामोशी, तलवार वाल्मिकी नायकवडी यांची तत्सम जमात आहे, बेडर या जमातीला महाराष्ट्र राज्यामध्ये अनुसूचित जातीत समाविष्ट केले आहे. केंद्र सरकारच्या सूचीनुसार बेडर ही जमात इतर राज्यात विशेषतः कर्नाटक राज्यात अनुसूचित जमातीत समाविष्ट केलेली आहे. अशा प्रकारे एकाच जमातीच्या बाबतीत सामाजिकदृष्ट्या भेदभाव झालेला आहे. पर्यायाने ह्या सर्व जमाती एकच असून या जमातींना कोणत्याही वाजवी किंवा तार्किक निकषांशिवाय वेगवेगळ्या गटात आणि प्रवर्गात समाविष्ट करण्यात असल्याने संविधानिक हक्क व अधिकारांचे आजही उल्लंघन होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
न्या. आर. एम. बापट यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मागास वर्ग आयोगाने बेडर, बेरड, रामोशी या एकच जमाती असून या जमातींना कोणत्याही वाजवी किंवा तार्किक निकषांशिवाय वेगवेगळ्या गटात आणि प्रवर्गात समाविष्ट करण्यात आले असल्याने बेरड, बेडर, रामोशी व त्याच्या तत्सम जमातींचा समाज शास्त्रीय व मानववंशीय शास्त्रीय पद्धतीने सखोल अभ्यास करुन केंद्र शासनाकडे या जमातींचा अनुसूचित जाती/जमातीच्या यादीमध्ये समावेश करण्या संदर्भात योग्य ती शिफारस करावी अशी सूचना करण्यात आली असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे.
बेरड, रामोशी समाजाला जातीचा दाखला मिळण्यासाठी 1961 च्या वास्तवाचा पुरावा मिळण्याबाबत अनेक अडचणी येत असल्याने हा समाज शासकीय सोयी सुविधांपासून वंचीत राहत आहे. सदरची अडचण लक्षात घेऊन जातीचा दाखला मिळण्यासाठी शासनाच्या जाचक अटी शिथील करुन राज्य स्तरावर जातीच्या दाखला व इतर नागरिकत्व पुरावे मिळण्याबाबत विशेष मोहीम राबविण्यात यावी. गेल्या अनेक पिढ्या या समाजाचे लोक गावामध्ये राहतात परंतू घर बांधण्यासाठी स्वतःच्या मालकीची जागा नसल्यामुळे या समाजाला घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे या समाजाला घरकुल योजनेचा लाभ मिळण्यासाठी शासकीय/ निमशासकीय जमिनीवरील राहती घरे व वहिवाटी खाली असणारे क्षेत्र नियमीत करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील इदाते समिती 1999 च्या अहवालानुसार रामोशी समाजातील 75% लोक भूमिहीन आहेत, 96% कुटुंबाना कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळाला नाही, रामोशी समाजातील कुटुंबाचे सरासरी वार्षिक उत्पन्न 13,500/ इतके आढळून आले. त्यामुळे रामोशी समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी स्वतंत्र आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे, रामोशी समाजातील 50 टक्के स्त्रिया निरक्षर आहेत तसेच या समाजातील महिला आर्थिकदृष्ट्या वंचीत आणि मागास आहेत त्यामुळे रामोशी, बेरड समाजातील महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी विशेष योजना सुरु करव्यात. बेरड, रामोशी, बेडर समाजातील सुशिक्षित युवक – युवतींसाठी पोलीस, मिलिट्री, सुरक्षा बल आणि तत्सम प्रकारच्या प्रशिक्षणासाठी अत्याधुनिक संकुल तयार करुन प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या क्षेत्रात सामावून घेण्यात यावे.
शासनाच्या ताब्यात असलेल्या इनाम वर्ग अ, ब च्या वतनी जमिनीची श्वेत पत्रिका जाहीर करण्यात यावी व धनदांडग्यांनी बळकावलेल्या व शासनाच्या ताब्यात असलेल्या इनाम वर्ग अ, ब च्या वतनी जमिनी रामोशी समाजाला बिनशर्त परत मिळाव्यात या समाजावर गुन्हेगारीचा शिक्का व कलंक असल्यामुळे या समाजावर खोटे गुन्हे दाखल होऊन पोलीस प्रशासन व समाजातील लोकांकडून अन्याय अत्याचाराला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या समाजाला -ीीेंलळीूं -लीं चे संरक्षण मिळावे, दाखल करण्यात आलेल्या केसेसचा शासन स्तरावर सविस्तर आढावा घेऊन योग्य ते कायदेशीर संरक्षण मिळावे, आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या भिवडी या जन्मगावी अपूर्ण असलेले राष्ट्रीय स्मारक उभे करण्यासाठी शासकीय निधीची भरीव तरतूद करण्यात यावी, आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जीवनावर मराठी चित्रपट निर्मितीसाठी भरीव निधीची तरतूद करण्यात यावी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांचे स्वराज्याची स्थापना करण्यासाठी मोलाचे योगदान असल्याने बानुरगड येथील बहिर्जी नाईक यांच्या स्मारकाचा विकास आराखडा तयार करुन भरीव निधीद्वारे भव्य राष्ट्रीय स्मारक उभे करण्यात यावे, रामोशी समाजाला विधान सभा, विधान परिषद, लोकसभा आणि राज्यसभा पर्यंत आजतागायत राजकीय प्रतिनिधीत्व मिळाले नसल्याने समाजाचे प्रश्न प्रलंबीत राहिले आहेत, समाज विकासापासून दूर राहिला आहे त्यासाठी या समाजाला राजकीय प्रतिनिधित्वाची संधी देण्यात यावी, विजापूर – गुहागर महाराष्ट्रतील जुना महामार्ग असून बहिर्जी नाईक यांनी ह्या जुन्या मार्गांचा शोध लावला असल्याने या महामार्गाला बहिर्जी नाईक यांचे नाव देण्यात यावे आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
निवेदनावर जयमल्हार क्रांती संघटना सातारा जिल्हाध्यक्ष ड. राहुल मदने, तालुकाध्यक्ष हणमंत जाधव, राज्य कार्यकारणी सदस्य बाळासाहेब मदने, बापूराव शिरतोडे, सातारा जिल्हा उपाध्यक्ष भरत जाधव, सातारा जिल्हा युवक कार्याध्यक्ष सुनिल जाधव यांच्यासह पदाधिकार्यांच्या सह्या असून यावेळी संघटनेचे सदस्य उपस्थित होते.