स्थैर्य, मुंबई दि. 3 : प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक सरोज खान यांच्या निधनामुळे बॉलिवूडच्या नृत्यगुरू हरपल्या, अशी शोकभावना सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केली.
श्री. देशमुख आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, सरोज खान यांनी बॉलिवूडमध्ये आजपर्यंत अनेक प्रसिद्ध गाण्यांचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. सरोज खान यांच्या नृत्य शिकवणीमुळे बॉलिवूडमधील अनेक कलाकारांचे करिअर झालं आहे. सुरुवातीच्या काळात चित्रपटात नृत्यदिग्दर्शन यासाठी फक्त पुरुष नृत्य दिग्दर्शकाचा विचार केला जायचा, त्या काळात सरोज खान यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःचे नाव कमावले. त्यांच्यामुळेच आज वेगवेगळ्या चित्रपट पुरस्कारांमध्ये नृत्यदिग्दर्शकालाही त्याच्या कामासाठी नावाजले जाऊ लागले.
मिस्टर इंडिया, चांदणी, बेटा, तेजाब, नगीना, डर, बाजीगर, अंजाम, मोहरा, याराना, दिलवाले दुल्हनिया, परदेस, देवदास, लगान, सोल्जर, ताल, फिजा, साथिया, स्वदेश, कुछ ना कहो, वीर जारा, डॉन, फना, गुरू, नमस्ते लंडन, जब वी मेट, एजंट विनोद, राउडी राठौर, एबीसीडी, तनु वेड्स मनु रिटर्न्स, मणिकर्णिका, कलंक या चित्रपटांसाठी त्यांनी केलेले नृत्यदिग्दर्शन आपल्या सर्वांच्या कायम लक्षात राहील. सरोज खान यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्यासाठी बळ मिळो, अशी सांत्वनपर भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे.