
दैनिक स्थैर्य । दि. २६ जुलै २०२२ । सातारा । गेल्या नऊ दिवसांपूर्वी नागठाणे (ता.सातारा) येथील उरमोडी नदीत बेपत्ता झालेल्या सनी उर्फ मनोज सुधाकर गडकरी (वय.२९,रा.मूळ.अपशिंगे मि. ता.सातारा,हल्ली रा.नागठाणे. ता.सातारा) याचा मृतदेह सोमवारी दुपारी उरमोडी नदीपात्रातच आढळून आला.सायंकाळी उशिरा त्याचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला.
गेल्या रविवारी सनी उर्फ मनोज गडकरी हा नागठाणे गावातील दोन मित्रांसोबत जुन्या पुलनाजीक उरमोडी नदीत पोहण्यासाठी गेला होता. त्या वेळी परिसरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नदीच्या वेगवान प्रवाहात तो बेपत्ता झाला होता. गेले नऊ दिवस बोरगाव पोलिसांसह नातेवाईक नदीपात्रात त्याचा शोध घेत होते. त्याच्या शोधासाठी एन.डी.आर.एफ च्या टीमला ही पाचारण करण्यात आले होते. मात्र, वेगवान पाण्याच्या प्रवाहामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश आले नव्हते.
सोमवारी दुपारी नागठाणे परिसरातील मळवी नावाच्या शिवारालगत मासेमारी करण्यासाठी गेलेल्या मुलांना नदीपात्रात झुडपात अडकलेल्या स्थितीत एक मृतदेह आढळला. या घटनेची माहिती बोरगाव पोलिसांना देण्यात आली.सायंकाळी उशिरा नदीपात्रातून मृतदेह बाहेर काढण्यात आला. हा मृतदेह बेपत्ता मनोज गडकरी याचा असल्याचे निष्पन्न झाले. मृतदेहची अवस्था खराब झाल्याने नागठाणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱयांनी जागेवरच शवविच्छेदन केले. त्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.