दैनिक स्थैर्य । दि. ०६ फेब्रुवारी २०२३ । पंढरपुर । तथागत गौतम बुद्धाने त्यांच्या महापरिनिर्वाणाची घोषणा केलेला दिन म्हणून प्रसिद्ध असलेल्या माघ पौर्णिमा निमीत्त पंढरपुरातील पवित्र बोधिवृक्षाचे पूजन ॲड. किर्तीपाल सर्वगोड, ॲड. किशोर खिलारे यांनी केले. बोधिवृक्षास जलसिंचीत करताना अध्यात्मिक समाधान लाभल्याचे प्रतिपादन केले. यावेळी त्यांनी पंढरपूर नगरपरिषद प्रस्तावित बुद्धभुमीच्या निधी मंजुरीसाठी विविध शासकीय स्तरांवर सुरू असलेल्या प्रस्तावाचा आढावा घेतला. या स्थळाला भेट देणाऱ्या प्रतिष्ठित उपासकांची वाढती संख्या दिवसेंदिवस वाढत असून २०१२ पासून प्रस्तावित असलेल्या आणि पंढरीच्या विकासामध्ये विशेष महत्त्व असलेल्या या बुद्धभूमीच्या प्रस्तावासबंधी शासनाने आणि प्रशासनाने आपल्या कामाचा वेग वाढवावा असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी ॲड. किशोर खिलारे यांनी पंढरपूर नगरपरिषदेने बुद्धभुमिसाठी या सुंदर परिसराची निवड केल्याबद्दल समाधान व्यक्त करीत या पर्यावरणपूरक बुद्धभूमीच्या विकासासाठी सम्यक क्रांती मंचचे पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण योगदान देण्याचे जाहीर केले.
यावेळी सम्यक क्रांती मंच चे संस्थापक; सिद्धार्थ जाधव, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रशांत लोंढे, सोलापूर जिल्हाध्यक्ष रवि शेवडे; तसेच संभाजी ब्रिगेडचे विनोद धुमाळ, तसेच डॉ. प्रशांत सर्वगोड, शुभम ठोकळे, योगेश रणदिवे, क्रिडा शिक्षक सोमनाथ सुरवसे आदी पर्यावरणप्रेमी मान्यवर उपस्थित होते.
सर्वांनी धम्ममित्र प्रभाकर सरवदे यांच्या नेतृत्वात या बुद्धभूमिवरील धम्मध्वजास वंदन करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.