दैनिक स्थैर्य । दि. १५ ऑगस्ट २०२२ । फलटण । गुणवरे ता. फलटण जि. सातारा येथील ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या विद्यालयात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजारोहण गुणवरे गावच्या सरपंच सौ शशिकला गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गुणवरे गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य श्री विश्वासराव गावडे, गुणवरे ग्रामपंचायत सदस्य सौ अनिता नाळे, सौ सविता आढाव, संस्थेच्या सचिवसौ साधनाताई गावडे, अध्यक्ष श्री ईश्वर गावडे, अकलूज उपविभागाचे वाहन निरीक्षक श्री संभाजीराव गावडे, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी परेड करून ध्वजास सलामी दिली तसेच नर्सरी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी ढोल ताशाच्या गजरात कवायत प्रकार सादर केले. त्यानंतर इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी योगा डान्स, इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी लेझीम डान्स व प्री प्रायमरी वर्गांनी देशभक्ती गीतावर सामूहिक नृत्य सादर केले. त्याचप्रमाणे इयत्ता दुसरीतील सिद्धी सुडके व इयत्ता चौथीतील स्वरा शिंदे या विद्यार्थ्यांनी वैयक्तिक नृत्य करून सर्वांची मने जिंकली. सहावी ते नववीच्या मुली नृत्यशिक्षक श्री तेजस फाळके सर यांनी नृत्य करून कार्यक्रमाला शोभा आणली. नंतर नर्सरी ते इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनावर मराठी, हिंदी आणि इंग्रजीतून भाषणे सादर केली. दरम्यान गुणवरे व पंचक्रोशीतील भारतीय सेनेतून निवृत्त झालेले फौजी यांचा शाळेच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. शाळेचे प्राचार्य श्री गिरीधर गावडे सर यांनी सर्वांचे स्वागत करून शाळेतील उपक्रमांची माहिती दिली. यावेळी गुणवरे गावातील सहकारी संस्था, पालक व नागरिकांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनानिमित्त खाऊचे वाटप केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील नृत्य शिक्षक श्री तेजस फाळके सर, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रज्ञा आढाव मॅडम व मेघना बनकर मॅडम यांनी केले तर आभार रमेश सस्ते सर यांनी मानले.