दैनिक स्थैर्य | दि. २० जानेवारी २०२४ | फलटण|
‘भाजी घ्या भाजी… ताजी ताजी भाजी’, ‘चहा… गरम चहा’, असे वेगवेगळ्या प्रकारे आवाज देत आपल्या मालाची विक्री करणार्या छोट्या विक्रेत्यांचा गुणवरे, ता. फलटण, जि. सातारा येथील ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या विद्यालयात ‘मार्केट डे’ व ‘फूड फेस्टिव्हल’ उत्साहात साजरा झाला.
विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच व्यवहार ज्ञान मिळवे, व्यवसाय करताना खरेदी-विक्री, नफा-तोटा या बाबी शिकाव्यात, ग्राहकांशी संवाद साधण्याची कला आत्मसात करावी, त्याचबरोबर आत्मविश्वास वाढावा, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष श्री. ईश्वर गावडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व फित कापून या मार्केट डे व फूड फेस्टिवलचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
या बाजारात प्रामुख्याने मेथी, कांदे, मिरची, चिंचा, वांगी, शेवगा, टोमॅटो, कांद्याची पात, कोथिंबीर, पालक इ. शेतमाल तसेच मिठाई, वडापाव, सामोसे, ढोकळा, इडली, लाडू, केक, चहा, सरबत आदी खाद्यपदार्थ, टोपल्या, इमिटेशन ज्वेलरी, किराणा साहित्य हे विक्रीसाठी विद्यार्थ्यांनी आणले होते. पालक, ग्रामस्थ, शिक्षक यांनी या चिमुकल्या विद्यार्थ्यांकडून साहित्य खरेदी केले, त्यांच्याशी संवाद साधला. त्यांचे व्यवहार ज्ञान, संभाषण कौशल्य पाहून सर्वजण आनंदी झाले. शाळेतील पालक, ग्रामस्थ यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
संस्थेच्या सचिव सौ. साधनाताई गावडे, अकलूज उपविभागाचे वाहन निरीक्षक श्री. संभाजीराव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे प्राचार्य श्री. गिरीधर गावडे, उपप्राचार्या शीतल फडतरे, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचार्यांनी या उपक्रमाचे नियोजन केले होते. कार्यक्रमाचे आभार श्री. रमेश सस्ते यांनी मानले.