दैनिक स्थैर्य । दि. १३ जून २०२२ । सातारा । रक्तदान अनमोल आहे. आपले रक्त गरजू रुग्णांना जीवनदान देऊ शकते. रक्ताची गरज कोणाला कधीही आणि कुठेही लागू शकते. त्यामुळे “करुन दान रक्ताचे ऋण फेडू समाजाचे” हे व्रत सर्वांनीच अंगिकारणे गरजेचे आहे.
Donating blood is an act of solidarity. Join the effort and save live, असे जागतिक आरोग्य संघटनेचे यंदाच्या वर्षीचे रक्तदान दिनानिमित्तचे घोषवाक्य आहे. रक्तदानाबाबत जाणिव जागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी १४ जून रोजी ‘जागतिक रक्तदाता दिन’ साजरा केला जातो.
संशोधक कार्ल लॅन्डस्टायनर यांचा १४ जून हा जन्म दिवस. त्यांनी A,B,O रक्तगटाचा शोध लावला. ‘जागतिक रक्तदाता दिन’ प्रथम सन २००४ मध्ये साजरा करण्यात आला आणि त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने दरवर्षी हा दिन जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले. रक्तदान करुन रुग्णांसाठी life saving gift दिलेले आहे अशा दात्यांचे व रक्तदान शिबीर संयोजक यांनी रक्तदान शिबीरे आयोजित केल्याबाबत त्यांचे आभार मानणे व युवा वर्गामध्ये नियमितपणे स्वैच्छिक रक्तदान करण्यासाठी जनजागृती निर्माण करणे आहे.
राज्यात स्वैच्छिक रक्तदानाची टक्केवारी ९९.०७% आहे. महाराष्ट्र राज्य देशामध्ये रक्तसंकलनाच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर आहे. राज्यामध्ये ३६१ रक्तकेंद्र आणि ३६१ रक्त साठवणूक केंद्रे आहेत. कोविड -१९ महामारीचा काळ असतानादेखील महाराष्ट्राने अनुक्रमे १५.२८ व १६.७३ लाख युनिट रक्त संकलन केले. देशातील अव्वल क्रमांक कायम ठेवला.
रक्तदानाचे महत्त्व
जग प्रगत झालेले असतानाही रक्ताला कुठलाही पर्याय शोधता आलेला नाही. माणसाला फक्त माणसाचेच रक्त लागते. जगामध्ये दर दोन ते तीन सेकंदाला कुणाला ना कुणालातरी रक्ताची गरज भासते. आजकाल धावपळीच्या काळात दिवसेंदिवस रक्ताची मागणी वाढते आहे. अपघात, छोट्यामोठ्या शस्त्रक्रिया, प्रसूतीदरम्यान रक्तस्त्राव, विविध आजार, तसेच थॅलेसिमिया सारखे रक्ताशी निगडीत इतर आजार, मानवनिर्मित व नैसर्गिक आपत्ती, या कारणांमुळे रक्त व रक्तघटकाची मागणी वाढते आहे.
रक्तदानास “द्रवरूपी अवयवदान” (fluid transplant) म्हणून संबोधले जाते, कारण रक्त व रक्तघटक दिल्यामुळे लाखो रुग्णांचे प्राण वाचलेले आहेत. त्यामुळे रक्ताला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे.
नियमित रक्तदाते व रक्तदान शिबिर संयोजक यांच्या सहकार्यामुळे, महाराष्ट्रात स्वैच्छिक रक्तदानाची चळवळ चांगल्या प्रकारे रुजली आहे. त्यामुळे, महाराष्ट्र राज्य हे देशामध्ये रक्त संकलनामध्ये आघाडीवर आहे. कोरोना सारख्या आजाराच्या संक्रमण काळातही रक्त संकलन १६.७३ लाख युनिट होते.
रक्त संक्रमण सेवा मजबूत
महाराष्ट्रामध्ये रक्त संक्रमण सेवेसाठी सद्यस्थितीत ३६१ रक्तकेंद्रे कार्यरत आहेत. त्यापैकी ७६ रक्तकेंद्रे शासकीय क्षेत्रातील आहेत तर उर्वरित २८५ रक्तकेंद्र धर्मादाय संस्था, खाजगी संस्था व इंडियन रेड क्रॉस संचलित आहेत. तसेच महाराष्ट्रामध्ये ग्रामीण पातळीवर ३६१ रक्त साठवणूक केंद्र आहेत. एवढ्या मोठया प्रमाणात रक्त सेवेच्या पायाभूत सुविधा व जाळे असणारे महाराष्ट्र एकमेव राज्य आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्त सेवेच्या पायाभूत सुविधा व जाळे असणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. रक्ताची आयुर्मर्यादा (shelflife) फक्त ३५ दिवस असल्याने एकाचवेळी जास्तीचे रक्त संकलन करता येत नाही. यामुळे रक्तदात्यांनी विशेषतः युवा वर्गाने नियमित म्हणजे दर तीन महिन्याला रक्तदान करावे.
रक्तदान करणे सहज सोपे
रक्तदान करणे सुलभ प्रक्रिया आहे. त्यासाठी केवळ १० मिनिटे लागतात. आपल्या शरीरामध्ये ४ ते ५ लिटर रक्ताचा साठा असतो. ३५० मिली म्हणजे शरीरातील एकूण रक्ताच्या ५% रक्तदान केल्याने आपल्या शरीरावर काहीही परिणाम होत नाही. त्यामुळे वर्षातून ४ वेळा तरी १८ ते ६५ वयोगटातील निरोगी व्यक्तींनी रक्तदान करावे. एका रक्तदानातून तुम्ही ४ व्यक्तींना जीवनदान देऊ शकता. १८ ते ६० वयोगटातील आणि ४५ किलोपेक्षा जास्त वजन असणारी कोणतीही व्यक्ती रक्तदान करु शकते. मात्र वैद्यकीय तपासणी करुन दाता रक्त देण्यासाठी योग्य आहे की नाही हे ठरवले जाते. तीन महिन्यांतून एकदा रक्तदान करावे.
स्वतःचे रक्त वापरणे
कोणताही व्यक्ती आपले स्वतःचे रक्त स्वतःसाठी वापरु शकतो. पूर्वनियोजित शस्त्रक्रिया असणारी व्यक्ती अगोदर रक्तदान करुन शस्त्रक्रियेदरम्यान रक्त वापरु शकतो. यामुळे ऐनवेळी धावपळ करावी लागत नाही. संक्रमणाची शक्यता नसते. स्वतःचे रक्त अत्यंत सुरक्षित असते, रक्तदान कोणत्याही शासनमान्य पेढीतच करावे.
- रवींद्र राऊत
( लेखक माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मंत्रालय येथे वरिष्ठ सहायक संचालक म्हणून कार्यरत आहेत)
( संदर्भ : राज्य रक्त संक्रमण परिषद, जागतिक आरोग्य संघटना)