दैनिक स्थैर्य | दि. २५ सप्टेंबर २०२३ | फलटण |
संपूर्ण राज्यभर गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. गणेशोत्सव म्हणजे सामाजिक बांधिलकी व एकोपा जपणारा उत्सव. या उत्सवात अनेक गणेशोत्सव मंडळे आपापल्या परीने वेगवेगळे सामजिक व लोकोपयोगी उपक्रम राबवत असतात. रक्तदानाला सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. आज बर्याच प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. कोणत्याही गरजू व्यक्तीला याची उणीव भासू नये या गोष्टीची जाणीव ठेवून फलटण शहरातील रविवार पेठ तालीम मंडळाने रक्तदानासारखा सामाजिक उपक्रम राबवून सर्वांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
यावेळी मोठ्या प्रमाणात तरुणवर्ग, महिलावर्ग यांनी उपस्थित राहून उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. तसेच ज्या रक्तदात्याने रक्तदान केले आहे, त्यांना रविवार पेठ तालीम मंडळातर्फे एक छोटीशी भेट स्वरूपात वस्तू व प्रमाणपत्र देखील देण्यात आले. आणि ज्यावेळी रक्तदात्याला किंवा त्यांच्या कोणत्या नातेवाईकाला रक्ताची गरज भासल्यास ते रक्त मोफत दिले जाईल, असेदेखील मंडळातर्फे मंडळाचे अध्यक्ष सूरज हिंदूराव कदम-पाटील यांच्यातर्फे सांगण्यात आले.
यावेळी फलटण नगर परिषदेचे नगरसेवक हेमंत हरिभाऊ निंबाळकर, नगरसेवक नानासाहेब पवार, फलटण तालुक्याचे युवा नेते सह्याद्री चिमणराव कदम, मंडळाचे मार्गदर्शक रविंद्र जंगम, नितीन चोरमले, मोहन पोतेकर, किरण शहाणे, कैलास कदम, संजय शिंदे, नगरसेवक जॉनी पलंगे व इतर मान्यवरांनी रक्तदान शिबिरास भेट दिली.
हा सर्व कार्यक्रम पार पाडण्यात रविवार पेठ तालीम मंडळाचे अध्यक्ष सूरज हिंदूराव कदम-पाटील, उपाध्यक्ष शेखर पवार, मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि सर्व कार्यकर्ते तसेच अक्षय ब्लड सेंटरचा संपूर्ण स्टाफ यांनी सर्वांनी मिळून हा कार्यक्रम उघडा मारुती मंदिर, रविवार पेठ येथे यशस्वीरित्या पार पाडला.