स्थैर्य, फलटण दि.१९: महापुरुषांचा जीवनपट आपल्या विशिष्ट शैलीत लिहून, कवितेच्या माध्यमातून, विविध विषयांवर लिखाण करून अल्पावधीतच सुपरिचित झालेले लोणंद (ता.खंडाळा) येथील प्रसिद्ध युवा कवी दिपक क्षीरसागर यांची नुकतीच अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या खंडाळा तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे सातारा जिल्हाध्यक्ष सचिन गोसावी, सरचिटणीस नवनाथ कोलवडकर, मालोजीराजे विद्यालय लोणंदच्या मुख्याध्यापिका सौ.सुनंदा नेवसे, साथ प्रतिष्ठाणचे अध्यक्ष कय्युम मुल्ला, सचिव मंगेश माने, जननायक आमदार मकरंद आबा पाटील विचार मंच लोणंद अध्यक्ष दिपक जाधव, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे फलटण तालुका उपाध्यक्ष आकाश आढाव, युवा नेते विशाल क्षीरसागर, शेखर क्षीरसागर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र देऊन खंडाळा तालुका अध्यक्षपदी निवड केल्याची घोषणा केली.
निवडीनंतर दिपक क्षीरसागर यांनी गावागावांत जाऊन विद्यार्थी व युवकांमध्ये साहित्याविषयी उर्जितावस्था निर्माण करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणार असल्याचे सांगितले.
सदर निवडीबद्दल कवी दिपक क्षीरसागर यांचे साहित्य, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवर व मित्रपरिवार यांनी अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सागर क्षीरसागर यांनी केले तर आभार कवी दिपक क्षीरसागर यांनी मानले.