स्थैर्य, फलटण दि. २७ : फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन, आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित बापूसाहेब केशवराव तथा बी. के. भाऊ निंबाळकर यांचे वयाच्या 73 व्या वर्षी पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना निधन झाले.
स्व. बी. के. भाऊ यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली त्याचबरोबर येथील फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मालोजीराजे शेती विद्यालयात अद्यापनाचे काम करताना अनेक विद्यार्थी घडविले आहेत, त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांना आवड होती, त्यातून त्यांची विविध विषयांवरील 5/6 पुस्तके प्रकाशीत झाली आहेत. निसर्गात रमणार्या या शिक्षकाला वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचा छंद होता तो जोपासताना रोपे तयार करुन इतरांना देऊन वृक्षारोपनासाठी त्यांना प्रवृत्त करण्यात ते सतत प्रयत्नशील असत.
ओबीसी आरक्षण बचाव संघर्ष वारी, आमदारांच्या दारी
राजकीय, सामाजिक क्षेत्रात ते सतत सहभागी होऊन लोकांचे प्रबोधन आणि त्यांच्या प्रश्नांची मांडणी शासन/प्रशासनासमोर करुन त्याच्या सोडवणुकीसाठी त्याचा प्रयत्न असे.
भाजपा जनता युवा मोर्चा प. महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुशांत निंबाळकर यांचे ते वडील होत.
आज (शुक्रवार) त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी फलटण येथील निवासस्थानी ठेवण्यात आले, त्यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, आप्तेष्ट, मित्र मंडळी यांनी अंत्यदर्शन घेऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. सायंकाळी त्यांच्या जन्मगावी विंचुर्णी, ता. फलटण येथे बेंद नावाचे शिवारातील शेतावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.