स्थैर्य, फलटण : राज्यसभा सदस्यांच्या शपथविधीच्या वेळी छत्रपती उदयनराजेंच्या “जय भवानी, जय शिवाजी” या उद्घोषावर आक्षेप घेतल्यावरुन राज्यात तीव्र संतापाची लाट दिसून आली. अनेक ठिकाणी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूच्या विरोधात आंदोलनं करण्यात आली. राज्यसभा खासदारांनी परवा (22 जुलै) शपथ घेतली. यावेळी भाजप नेते छत्रपती उदयनराजे यांनी इंग्लिशमध्ये शपथ घेतली. शपथ घेऊन झाल्यावर त्यांनी “जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी जय शिवाजी” अशी घोषणा दिली. मात्र यानंतर सभापतींनी छत्रपती उदयराजेंना समज दिली होती. “तुम्ही सदनात नवीन आहात, त्यामुळे सांगतो की हे रेकॉर्डवर जाणार नाही, फक्त तुमची शपथ नोंदवली जाईल. सदनात कोणतीही घोषणा देण्याची मुभा नाही, हे भविष्यात लक्षात असू द्या” असं व्यंकय्या नायडू म्हणाले. या बाबत फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनीही निषेध नोंदवलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे अंखड हिंदुस्थानचे दैवत आहेत. त्या सोबतच फलटणच्या राजघराण्याच्या नात्यातील आहेत, त्या मुळे छत्रपती शिवाजी महारांजांबद्दल कोणीही काहीही बोलले तरी सहन केले जाणार नाही असे श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.