स्थैर्य, फलटण : फलटण शहर व तालुक्यात गेल्या सुमारे तीन/साडेतीन महिन्यापासून करोना प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवणेकामी प्रबोधन, करोना आजाराची लक्षणे, त्याबाबत घ्यावयाची दक्षता, शासन/प्रशासनाने उपलब्ध करुन दिलेल्या सोई सुविधा याविषयी माहिती देणे, बाधीतांची काळजी वगैरे विविध विषय हाताळण्याबरोबर प्रशासनाकडील नेहमीची जबाबदारी सांभाळताना महसूल, पोलीस, नगर परिषद, पोलीस पाटील, आरोग्य विभागातील अधिकारी/कर्मचारी अक्षरशः थकून गेले आहेत त्यांना मदतीचा हात देऊन सर्वांच्या सहकार्य व एकजुटीने करोना हद्दपार करण्यासाठी शहर व तालुक्यातील स्वयंसेवी संस्था/व्यक्तींनी पुढे येण्याची आवश्यकता प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी व्यक्त केली आहे.
बाहेरुन आलेल्यां साठी संपूर्ण व्यवस्था
फलटण शहर व तालुक्यात पुणे मुंबईसह अन्य शहरातून मोठ्या संख्येने दाखल झालेले या तालुक्यातील मुळचे रहिवाशांसमवेत करोना शहरातून येथे आला तर नियंत्रण आवाक्याबाहेर जाण्याचा धोका लक्षात घेऊन विना परवाना कोणीही येथे येणार नाही, येथे आल्यावर त्यांच्या संपूर्ण माहितीची नोंद तालुक्याच्या सीमेवर केली जाईल, गरज असेल तर त्यांना गावातील प्रा. शाळा किंवा अन्य सार्वजनिक इमारतीमध्ये सर्व नागरी सुविधा उपलब्ध करुन देऊन तेथे किंवा सोय असेल तर त्यांच्या घरात स्वतंत्र निवासाची व्यवस्था करुन तेथे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली ७ दिवस ठेऊन त्यांना कोणतीही बाधा नसल्याची खात्री नियमीत आरोग्य तपासणीद्वारे करण्यात आल्यानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले, काही आजार असल्याचे निष्पन्न झाल्यावर तातडीने आवश्यक वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करुन देताना येथील प्रशासन यंत्रणेने घेतलेली मेहनत निश्चित प्रेरणादायी असल्याचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी निदर्शनास आणून दिले.
संशयीत व बाधीतांसाठी सर्व व्यवस्था चोख
शहराच्या एखाद्या भागात किंवा तालुक्यातील गावात करोना संशयीत रुग्ण आढळल्यानंतर त्याला उप जिल्हा रुग्णालयात दाखल करुन त्याच्या घशातील स्त्रावाचा नमुना घेऊन तो तपासणीसाठी पाठविणे तो पर्यंत त्यांना स्वतंत्र कक्षात ठेऊन नियमीत आरोग्य तपासणी करताना त्यांच्या संपर्कातील लोकांची आरोग्य विषयक तपासणी, अहवाल आल्यानंतर सदर व्यक्ती बाधीत निष्पन्न झाल्यास त्यांना योग्य उपचारासाठी दाखल करणे, त्यांच्या निकट संपर्कातील व्यक्तींची माहिती घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी, त्यांच्या निवास व परिसराची पाहणी करुन सदर प्रतिबंधीत क्षेत्रात सर्व आरोग्य विषयक तपासण्या/उपाययोजना करुन प्रादुर्भाव वाढणार यासाठी दक्षता घेणे मग प्रतिबंधीत क्षेत्रात लॉक डाऊन मुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचे निराकरण, तेथील नागरी सुविधा सुरळीत राहतील यासाठी घ्यावयाची दक्षता वगैरे सर्व बाबी प्रशासनाने उत्तम प्रकारे हाताळल्याने कोणतीही अडचण झाली नाही सर्वांचे सहकार्य व एकजुटीने आतापर्यंत करोना नियंत्रणात राहिला मात्र आता रुग्ण संख्या वाढत असताना प्रशासन यंत्रणा थकल्याने त्यांना मदतीची नितांत आवश्यकता असल्याचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
विविध कक्ष व अन्य व्यवस्था उत्तम
करोना नियंत्रणासाठी प्रयत्नशील असताना क्वारंटाइन कक्ष, संशयीत बाधीत रुग्णांसाठी कक्ष, बाधीत रुग्ण कक्ष निर्माण करुन तेथे विविध संस्था व्यक्तींच्या माध्यमातून निवास, भोजन व्यवस्था, दैनंदिन आरोग्य तपासणी व उपचार सुविधा उपलब्ध करून देणे, मुख्यमंत्री सहाय्यता निधी संकलन, बेरोजगार, गरीब, निराधार व्यक्तींसाठी अन्नछत्र सुविधा उपलब्ध करुन देताना ठेवावा लागणारा समन्वय यासर्व बाबींसाठी अहोरात्र मेहनत घेऊन प्रशासन यंत्रणा काही अंशी थकली आहे, तथापी कोणीही आपल्या जबाबदारी सांभाळताना गाफील नक्की नाही, मात्र त्यांना कोणीतरी मदत केली पाहिजे त्यासाठी स्वयंसेवी संस्था/व्यक्तींनी पुढे यावे असे आवाहन प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी केले आहे.