स्थैर्य, मुंबई, दि १: भारतातील पहिली महिला
हृदयरोगतज्ज्ञ (कार्डियोलॉजिस्ट) डॉक्टर एसआय पद्मावती यांचं वयाच्या १०३
व्या वर्षी शनिवारी निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर
आली होती. ११ दिवसांपूर्वीच त्यांना नॅशनल हार्ट
इन्स्टिट्यूट(एनएचआय)मध्ये दाखल करण्यात आले होते.
रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ओ. पी. यादव यांनी
सांगितले की, डॉ. पद्मावती यांना दोन्ही फुफ्फुसात गंभीर संक्रमण झाले,
ज्यामुळे त्यांचं निधन झालं. डॉ. पद्मावती यांच्या पश्चिम दिल्लीतील पंजाबी
बाग स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
महान हृदयरोगतज्ज्ञ असलेल्या या डॉक्टर शेवटच्या दिवसापर्यंत एक
सक्रिय आणि निरोगी जीवन जगल्या. 2015च्या अखेरीस त्या आठवड्यातून पाच दिवस,
दिवसा 12 तास एनएचआयमध्ये काम करत होत्या. त्यांनी 1981मध्ये एनएचआयची
स्थापना केली. त्यांच्या योगदानामुळेच त्यांना ‘कार्डिओलॉजीची गॉडमदर’ ही
पदवी देण्यात आली.
1954मध्ये त्यांनी लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेजमध्ये उत्तर भारतातील
प्रथम हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी प्रयोगशाळा स्थापन केली. 1967मध्ये
त्यांनी मौलाना आझाद मेडिकल कॉलेजचे संचालक-प्राचार्य म्हणून पदभार
स्वीकारला, इर्विन व जी. बी. पंत रुग्णालयातही रुजू झाले. येथूनच त्यांनी
कार्डिओलॉजीचा पहिला डीएम कोर्स, पहिलं कोरोनरी केयर युनिट आणि भारतातील
पहिली कोरोनरी केअर व्हॅन सुरू केली. डॉ. एस. पद्मावती यांनी 1962मध्ये ऑल
इंडिया हार्ट फाऊंडेशन आणि 1981मध्ये नॅशनल हार्ट इन्स्टिट्यूटची स्थापना
केली. भारत सरकारने 1967मध्ये त्यांना पद्मभूषण आणि 1992मध्ये
पद्मविभूषणाने सन्मानित केले होते.