स्थैर्य, मुंबई, दि.२७: ‘फॅब्युलस लाईव्ह्स ऑफ बॉलिवूड वाईफ्स’ या शीर्षकावरुन मधुर भांडारकर यांनी करण जोहरवर निशाणा साधत शीर्षक चोरीचा आरोप लावला होता. या प्रकरणावर अखेर करण जोहरने आपले मौन सोडले आहे. करणच्या या वेब शोचा ट्रेलर गेल्या आठवड्यात रिलीज झाला होता. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर या शोचे स्ट्रिमिंग होणार आहे. करणने सोशल मीडियाच्या माध्यमातून मधुर भांडारकर यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली मात्र शीर्षक बदलणार नसल्याचेही स्पष्ट केले.
करण जोहरचा माफीनामा
करण जोहरने सोशल मीडियावर माफिनाम्याचे पत्र पोस्ट करत मधुर भांडारकर यांची माफी मागितली आहे. या माफीनाम्यात करणने या वेब शोचे नाव ‘फॅब्युलस लाईव्ह्स ऑफ बॉलिवूड वाईफ्स’ ठेवण्यामागचे कारण देखील सांगितले आहे.
तो लिहितो, ‘प्रिय मधुर, आपण दोघेही बर्याच वर्षांपासून या इंडस्ट्रीचा एक भाग आहोत आणि आपले नाते खूप जुने आहे. मी त्या दिवसांत तुझ्या कामाचा चाहता होतो आणि नेहमीच तुझ्या चांगल्यासाठी प्रार्थना करतो. मला माहित आहे की, तू रागावला आहेस. तू गेल्या काही आठवड्यांत ज्या त्रासातून गेलास त्याबद्दल मी दिलगीर आहे. परंतु, मी सांगू इच्छितो की हे नवीन आणि वेगळे शीर्षक मी ‘फॅब्युलस लाईव्ह्स ऑफ बॉलिवूड वाईफ्स’या नॉन फिक्शन शो फ्रेंचाइजीवर आधारित फॉरमॅट लक्षात घेऊन ठेवले आहे. आमचे हे शीर्षक पूर्णपणे वेगळे आहे. म्हणून मला वाटले की, यामुळे तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही, यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो.’
तो पुढे म्हणतो, ‘आपण आता हे वाद मागे सोडून, पुढे जाऊया. प्रेक्षकांसाठी नवीन काहीतरी घेऊन येऊया. तुला तुझ्या नवीन प्रोजेक्टसाठी खूप शुभेच्छा आणि मला नेहमी तुझ्या नव्या कलाकृतींची प्रतीक्षा असेल’, असे म्हणत करण जोहरने या वादावर पडदा टाकण्याची मागणी केली आहे.
जिल्ह्यातील 226 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 3 बाधितांचा मृत्यु
मधुर भांडारकर म्हणाले – माफीचा स्वीकार मात्र माझी आशा काही वेगळी होती
यावर मधुर भांडारकर यांनीदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून करणला प्रतिक्रिया देताना त्याचे आभार मानले आणि लिहिले, “2013 मध्ये तुला गुटखा हे शीर्षक देण्यापूर्वी मी एकदाही आढेवेढे घेतले नाही, कारण तू मला त्यावेळी विनंती केली होतीस. यावेळी तुला मी ते टायटल वापरण्यास नकार दिला तेव्हा मला अशाच प्रकारच्या वर्तणुकीची अपेक्षा होती. मी या शीर्षकाची नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली होती कारण मला ते शेअर करायचे नव्हते.”
“सत्य हे आहे की आपल्यातील संवाद आणि ट्रेड असोसिएशनने रिजेक्ट केल्यानंतरही तू शीर्षक वापरुन पुढे गेलात. त्यामुळेच मी खूप दुःखी झालो. मी आता काम करण्यासाठी खऱ्या नातेसंबंधांचा विचार करत नाही, असे नाहीये. तर आपण पुढे जाऊया. तुझी माफी स्वीकारताना मी काही गोष्टी इथेच सोडून देऊ इच्छितो. मी तुला भविष्यासाठी शुभेच्छाही देतो.” असे भांडारकर म्हणाले आहेत.
काय होता वाद?
मधुर भांडारकर यांनी निर्माता करण जोहरवर शीर्षक चोरीचा आरोप लावला होता. तसेच, वेब सीरीजचे शीर्षक बदलण्याची मागणी देखील केली होती. आपण पाठवलेल्या कायदेशीर नोटीसलादेखील करण जोहर उत्तर देत नसल्याचे, मधुर भांडारकर यांनी म्हटले होते. शीर्षक चोरी प्रकरणी भांडारकर यांनी काल सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली होती. ते म्हणाले होते की, ‘19 नोव्हेंबरपासून धर्मा मुव्हीजला अनेक नोटीसा पाठविल्या गेल्या आहेत. त्यापैकी दोन आयएमपीए, एक आयएफटीडीए आणि दोन नोटीस एफडब्ल्यूईसीने पाठवल्या आहेत. या सर्व नोटिसा ‘बॉलिवूड वाईफ्स’ या चित्रपटाचे शीर्षक हस्तगत केल्याबद्दल पाठविल्या गेल्या आहेत. परंतु, यापैकी कोणत्याही नोटिसीवर धर्मा प्रोडक्शनने अद्याप कोणतेही अधिकृत उत्तर दिले नाही.’