
या कोरोनामुळे अनेक व्यवसाय बंद झाले. त्यातले काही परत सुरू झाले. काही अजून सुरू व्हायचे आहेत. हॉटेल, बार वगैरे सुरू होतील, अशा बातम्या आहेत. सिनेमा, मालिका आणि नाट्यव्यवसाय हेही बंद झाले. पण नंतर मालिकांची चित्रीकरणं सुरू झाली. योग्य ती काळजी घेऊन चित्रीकरण करण्यासाठी परवानगी मिळाली. काही सिनेमांचे शूटिंगही सुरू झाले. आता बाकी आहेत ते, नाटक, तमाशा, एकपात्री, जादूचे प्रयोग आणि इतर काही रंगमंचीय कलाप्रकार. हे मात्र अजूनही बंदच आहेत. यामुळे फक्त याच माध्यमातून कला सादर करणारे कलाकार होरपळले आहेत. आणि पुण्यामुंबईतील व उर्वरीत महाराष्ट्रातील व्यावसायिक रंगमंच, निमव्यावसायिक रंगमंच संबंधितांनी उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी यांनी केली आहे. अर्थात या कलाकारांची मोठी युनियन नसल्याने, त्यांना कोणतेही राजकीय पाठबळ नसल्याने आणि या कोणावरच कोणतीच व्होटबँक अवलंबून नसल्याने, आत्तापर्यन्त काहीही झालेले नाही. काही पक्षांच्या कलाकार शाखा आहेत. परंतू रंगमंदीरे सुरू होण्याबाबत काही हालचाल झाली आहे की नाही, हे समजत नाही. कला सादर झाली नाही, तर कलाकारांशिवाय कोणाचेच अडत नाही. शिवाय घरबसल्या नेटवरून लाखो व्हिडीओ फुकट बघायला मिळत असताना ही विकतची कला कोण बघायला जाणार, असाही विचार काही लोकांनी बोलून दाखवला. आता या परिस्थितीमध्ये कला सादर करायची म्हणजे प्रचंड सव्यापसव्ये आली. sanitisation पासून PPE किट्सपर्यंत शेकडो भानगडी आल्या. ठराविक अंतर ठेऊन प्रेक्षक बसवणे आले, ते गेल्यावर तो भाग परत स्वच्छ करणे आले. प्रत्येक कलाकार [ तंत्रज्ञ, बॅकस्टेज कलाकार इ.] यांची सुरक्षितता आली. पार्किंग ते कॅंटीन अशा अनेक गोष्टी आल्या. सगळ्यात महत्वाचे म्हणजे टॉयलेट्स आली !!
हा कोरोना जेव्हा नव्हता आणि रंगमंदीरे दुथडी भरून वहात होती…म्हणजे गेली अनेक दशके…तेव्हाही ही टॉयलेट्स कशी होती, हे आपल्याला माहिती आहेच. कलाकारांसाठी असलेली आणि प्रेक्षकांसाठी असलेली. त्यांच्या अस्वच्छतेबद्दल लाखो पोस्ट आत्तापर्यंत आलेल्या आहेत. सर्व गावातील सर्वच ऑडिटोरियम्स कमालीची अस्वच्छ असतात. टॉयलेट्स तर विचारू नका. शेकडो लोकांची शी, शू, लाळ, उलट्या, खाकरे, बेडके आणि इतर काही उत्सर्जने यांनी ही टॉयलेट्स नटलेली असतात. त्यावर पाणी टाकणे आणि ती स्वच्छ ठेवणे, हे नेमके कोणाचे काम आहे, हे अजून गेल्या 100 वर्षात ठरलेले नसल्याचे परवा नटराज सांगत होता. हे कमी म्हणून की काय कागदांचे बोळे, प्लॅस्टिकच्या पिशव्या, सुकलेले गजरे, रिकाम्या बाटल्या, खाऊन उरलेले खाद्यपदार्थ सगळीकडे पडलेले असतात. पाणी पिण्यासाठी यंत्रणेने जे कूलर्स बसवलेले आहेत, त्यांचे स्टीलचे ग्लास विशेष स्वच्छ असतात. त्यांवर लिपस्टिक ते मावा असे बरेच डाग असतात. धूळ, मळ आणि माशा या नैसर्गिक असल्याने आपण सोडून देऊ. बसल्या खुर्चीखाली पिचकार्या मारणारे प्रेक्षक, ते कोणतीच टॉयलेट्स कधीही स्वच्छ न ठेवणारे संबंधित कर्मचारी या कात्रीत रंगमंदीरे सापडली आहेत. ७० वर्षात साधी टॉयलेट्स ज्यांना साफ ठेवणे जमले नाही, त्यांना sanitisation पासून PPE किट्सपर्यंतचे व्यवस्थापन जमणे कदापिही शक्य नाही. शिवाय AC हा एक मोठा प्रश्न आहे. तो कोरोनाला चालत नाही म्हणे. तज्ज्ञ याबाबत अधिक सांगू शकतील. हे खरे असेल तर मुंबईचा विषयच संपला. मुंबईत AC शिवाय नाटक होणे, हे अशक्यच आहे. प्रेक्षकांच्या आधी कलाकार मरतील. पुण्यातल्या लोकांना तशी सवय आहे. फक्त हिवाळ्यातच AC चालू असतो. तोही २ च ठिकाणी. तर मुळात या परिस्थितीत आरोग्यविषयक कोणत्या काळज्या घ्यायच्या याबद्दल एक ४०-५० कलमी पत्रकच काढण्याची गरज आहे. प्रत्येक प्रयोगानंतर खुर्च्या, रंगमंच, दरवाजे, आरसे, लाइट रूम, ग्रीनरूम इत्यादी सर्व पृष्ठभागांचे सॅनिटायझेशन करावे लागेल. पण जिथे फक्त टॉयलेट स्वच्छ ठेवणे, यंत्रणेला जमले नाही, तिथे हे बाकीचे जमेल असे म्हणणे म्हणजे बेचा पाढा पाठ नसलेल्याकडून Wrangler होण्याची अपेक्षा बाळगण्यासारखे आहे. शिवाय या सगळ्या आरोग्य व्यवस्थेचा खर्च कोण करणार, निर्माता की शासन ? हाही महत्वाचा प्रश्न आहे.
तिकीटविक्रीची खिडकी, वाहनतळ, कॅंटीन, प्रेक्षागृहात प्रवेश करण्याची व नाटक संपल्यावर बाहेर जाण्याची जागा, सभागृह अशा अनेक ठिकाणी कोरोनासंसर्ग होण्याची शक्यता आहे. तसेच, कलाकारांना भेटणे, फोटो, सह्या…यावेळीही होण्याची शक्यता आहे. या सर्व ठिकाणी आरोग्यविषयक काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी इथे कमीच प्रेक्षक येऊन द्यायचे म्हणले [ ३००-४०० प्रेक्षकांपुरता हिशोब केला ] तर ते निर्मात्याला परवडणार नाहीये. शिवाय सर्व प्रेक्षकांनी ३ तास मास्क घालूनच बसावे लागेल. त्यातून शिंके आणि थुंके यांना त्वरीत बाहेर काढावे लागेल. शिट्टया मारणे, एकमेकांना टाळ्या देणे, हे कलास्वादाचे प्रकार लोकांना बंद करावे लागतील. शिवाय या सर्वांनाच आत घेताना ऑक्सीमीटर वगैरे लावून चेक करणे आले. तिथेही रांग लावून चालणार नाही. त्यात किमान एक दीड तास सहज जाईल. तितका वेळ आधी प्रेक्षकांना यावे लागेल. तर अशा बर्याच अडचणी आहेत. इथे न लिहिल्या गेलेल्याही अनेक अडचणी आहेत. तर या सर्वांवर काही उपाययोजना निघून ही रंगमंदीरे सुरू झाली, तर कलाकार सुखाने जगतील.
हे कधी होईल आणि मुळात होईल का, हे मात्र नटराजच जाणे !!
मिलिंद शिंत्रे.