स्थैर्य, सातारा, दि.६: राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. अशाच राज्यातील राजकारण विविध कारणांमुळे तापलेले आहे. सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्षांच्या एकमेकांवर टीका सुरूच आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून विरोधपक्षाकडून सत्ताधाऱ्यांवर सातत्याने टीका केली जातेय. मात्र आता खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी राजकारण दूर ठेवून एकत्र येऊया, असे आवाहन राज्य सरकारला केले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी पत्र लिहित मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे ही मागणी केली आहे. त्यांनी याविषयी एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. या पत्रकात त्यांनी, ‘राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून राज्यभरात कोरोनावर नियंत्रण मिळवणं कठीण होऊन बसलं आहे. ग्रामीण भागातही कोविड रुग्णांची वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे राजकारण बाजूला सारून सर्व राजकीय पक्षांनी आणि संस्थांनी एकजूट होऊन या महामारीविरुद्ध लढा देऊ’, असे आवाहन केले आहे.
राज्यात कोरोनाचे संकट गंभीर झाल्यामुळे सर्व राजकीय पक्ष आणि या परिस्थितीत सातत्यपूर्ण काम करणाऱ्या काही प्रमुख सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे या संकटाचा सामना करण्याची गरज निर्माण झाली आहे. विविध राजकीय पक्षांसोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, भारतीय जैन संघटना, इस्कॉन, टाटा ट्रस्ट, आर्ट ऑफ लिव्हिंग इत्यादी असे आपण सर्वजण एकत्रितपणे परिस्थितीचे विश्लेषण करणे, यावरील उपाययोजना ठरविणे आणि कामाची वाटणी करणे हे खूप आवश्यक असल्याचंही चंद्रकांत पाटील म्हणाले.