दैनिक स्थैर्य | दि. १४ ऑगस्ट २०२४ | फलटण |
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीकडून १५० जागा लढविण्याचं ठरलं असून याबाबत महाराष्ट्र प्रदेश भाजपाकडून मुंबईत मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जागा निश्चितीचे विशेषाधिकार दिल्याने फलटण – कोरेगाव विधानसभेसाठी महायुतीतून भाजपालाच उमेदवारी मिळणार असल्याचे समजते.लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना विधानसभा मिळालेली मते आणि गेल्या विधानसभेत मिळालेली मते तसेच सर्व्हेक्षण अहवालाच्या आधारे विधानसभानिहाय उमेदवार निवडले जाणार आहेत.
फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये असलेल्या मित्रपक्षाचा विद्यमान आमदार असला तरीही लोकसभा निवडणुकीत मित्रपक्षाने महायुतीच्या विरोधी काम केले होते, असे होऊनसुध्दा फलटण -कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून तब्बल १८ हजारांचे मताधिक्य हे भारतीय जनता पार्टीला आहे, त्यामुळे या मतदारसंघात भाजपाची उमेदवारी नक्की मानली जात आहे.
दरम्यान, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही पायाला भिंगरी लावत फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघ पिंजून काढला आहे. त्यातच फलटण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधील अनेक मोठ्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे, त्यामुळे येथून भाजपाची दावेदारी मजबूत झाली आहे.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटचे संबंध हे सातारा व सोलापूर जिल्ह्याला माहीत आहेत. त्यामुळे फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीतून भाजपालाच उमेदवारी मिळणार, हे निश्चित आहे.
भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच जागा निश्चितीचा अधिकार देण्यात आला आहे. त्यामुळे फलटण-कोरेगाव मतदारसंघातून महायुतीकडून भाजपाच शड्डू ठोकणार आहे.