स्थैर्य, मुंबई, दि.९: ओ.बी.सी समाजाचे राजकीय आरक्षण धोक्यात आणणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या निष्काळजी कारभाराच्या विरोधात भाजपा प्रदेश ओ.बी.सी. मोर्चातर्फे बुधवारी सकाळी विधानभवनावर ‘आक्रोश’ आंदोलन करण्यात येणार आहे. भाजपा ओ.बी.सी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
राज्यातील वाशीम, गोंदिया, धुळे, नागपूर, अकोला, नंदूरबार व भंडारा या जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीमध्ये राजकीय आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुका रद्द करून पुन्हा निवडणूका घेण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे निवडून आलेल्या ओबीसी उमेदवारांवर अन्याय झाला असून या सगळ्या प्रकरणाला राज्य सरकारचा बेजबाबदारपणा व निष्काळजीपणा कारणीभूत आहे. राज्य सरकारने योग्य वेळी लक्ष घालून ही नामुष्की टाळणे गरजेचे होते.
ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण धोक्यात आणणाऱ्या सरकारच्या या हलगर्जीपणाचा निषेध म्हणून भाजपा ओबीसी मोर्चातर्फे बुधवारी, 10 मार्च रोजी सकाळी 9 वाजता नरिमन पॉइंट ते विधानभवन असे ‘आक्रोश’ आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनामध्ये ओबीसी मोर्चाचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहितीही श्री. टिळेकर यांनी दिली.