स्थैर्य, सातारा, दि.९: बाळासाहेब गोसावी कुशल संघटक असून, भाजप संघटना वाढीसाठी ते चांगले काम करतील. गेली अनेक वर्ष ते आमच्यासोबत काम करत असून, त्यांच्या अनुभवाचा भाजपला फायदा होईल, तसेच जिल्ह्यात भाजप वाढीसाठी आमचा प्रयत्न असणार असल्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज सांगितले.
बाळासाहेब गोसावी यांची सातारा जिल्हा भाजप उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. जलमंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमास विविध मान्यवर उपस्थित होते. या वेळी गोसावी यांचे अभिनंदन करून उदयनराजे म्हणाले, “बाळासाहेब गोसावी कुशल संघटक असून, भाजप संघटना वाढीसाठी ते चांगले काम करतील. सातारा जिल्ह्यात भाजपचा मोठा विस्तार व्हावा, यासाठी आम्ही स्वत: प्रयत्न करणार आहोत. कार्यकर्त्यांनीही गाफील न राहता पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.
बाळासाहेब गोसावी यांनी माजी पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, जनता बॅंकेचे उपाध्यक्ष, ज्ञानवर्धिनी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, दुर्गामाता मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष अशा विविध पदावर काम करताना शाहूपुरीसह लिंब पंचक्रोशीत गोसावी यांनी अनेक विकासकामे व शैक्षणिक, सामाजिक कार्य केले आहे. अयोध्येतील राम मंदिरासाठी कारसेवेत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता, असेही त्यांनी सांगितले. या निवडीबद्दल गोसावी यांचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, माजी सभापती सुनील काटकर, नगराध्यक्ष माधवी कदम, उपाध्यक्ष मनोज शेंडे, ऍड. डी. जी. बनकर, संग्राम बर्गे, अमित कुलकर्णी, भाजप शहराध्यक्ष विकास गोसावी, सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, काका धुमाळ, जितेंद्र खानविलकर, संजय शिंदे, रवींद्र पवार, बाळासाहेब ढेकणे, बाळासाहेब ननावरे आदींनी अभिनंदन केले.