पत्रकार अर्णब गोस्वामींच्या अटकेचा सातार्‍यात भाजपातर्फे निषेध

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, सातारा, दि.४: राज्यातील महाविकास आघाडीच्या अपयशाबद्दल आणि चुकांबद्दल जाहीर सवाल करणारे पत्रकार अर्णब गोस्वामी यांना पोलिसांकरवी अटक करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने घटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला आहे. ठाकरे सरकारची ही कृती आणीबाणीबातील दडपशाहीची आठवण करून देणारी आहे, अशी टिका भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी केली.

पत्रकार अर्णब गोस्वामी यांना झालेल्या अटकाच्या निषेधार्थ भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सातारा शहर अध्यक्ष विकास गोसावी आणि सातारा ग्रामीण तालुकाध्यक्ष राजेंद्र इंगळे यांच्या नेतृत्वाखाली निषेध करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.

 

पावसकर म्हणाले की, पत्रकार अर्णब गोस्वामी यांना अटक करून प्रश्‍न विचारणार्‍या पत्रकारांवर दडपशाही करण्याचा भाजपा निषेध करते. संविधानाच्या मूल्यांवर विश्‍वास असणार्‍या सर्वांनी ठाकरे सरकारचा निषेध केला पाहिजे व घटनात्मक चौकटीत आणि कायदेशीर मार्गानेच काम करण्याचा आग्रह धरला पाहिजे. भाजपाचे कार्यकर्ते राज्यभर या अत्याचाराचा निषेध करतील. त्याचबरोबर लोकशाहीच्या रक्षणासाठी सर्व सुजाण नागरिकांनी आपापल्या पद्धतीने राज्य सरकारचा निषेध करावा. राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन, उपोषण, सरकारी कामकाजात असहयोग, सोशल मीडियावर आवाज उठवणे, मोर्चा काढणे, अशा शक्य त्या मार्गाने निषेध करण्यात येईल.

अर्णब गोस्वामी यांनी विचारलेल्या प्रश्‍नांमुळे अडचण झालेल्या ठाकरे सरकारने एका वास्तूविशारदाच्या आत्महत्येचे जुने प्रकरण उकरून काढून गोस्वामी यांना अटक केली. खरे तर या प्रकरणाचा तपास 2018 साली बंद झाला होता. राज्य सरकारला पुन्हा तपास करायचा असेल तरी त्यासाठी घटनेची चौकट आणि कायदेशीर प्रक्रिया यांचे पालन केलेच पाहिजे. तपासाच्या नावाखाली अत्याचार करणे ही केवळ मुस्कटदाबी असल्याचेही पावसकर म्हणाले.

पालघर जिल्ह्यात पोलिसांच्या साक्षीने जमावाने साधूंची हत्या करणे किंवा सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण अशा प्रकरणात पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी स्पष्टपणे व ठामपणे प्रश्‍न विचारून ठाकरे सरकारचे अपयश चव्हाट्यावर आणले होते. एक निर्भिड आणि रोखठोक पत्रकार म्हणून अर्णब गोस्वामी आपले काम करत असताना ठाकरे सरकारने सूडबुद्धीने अर्णब गोस्वामी यांना अटक केली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर आणीबाणी लादली, त्यावेळी सरकारचे अपयश आणि अत्याचार लपविण्यासाठी प्रसिद्धी माध्यमांवर वरवंटा फिरविण्यात आला आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केली गेली. त्याच पद्धतीने काँग्रेसच्या पावलावर पाऊल ठेऊन ठाकरे सरकारने महाराष्ट्रात माध्यमांची गळचेपी सुरू केली आहे. पत्रकारांना अटक करून खटले दाखल करण्याचे प्रकार या सरकारने सुरू केले आहेत. त्यासाठी कोणत्याही घटनेचे निमित्त केले जात आहे. मुख्यमंत्रीपदाच्या लोभाने काँग्रेससोबत आघाडी केल्यानंतर शिवसेनेने काँग्रेसची आणीबाणीची हुकुमशाही मानसिकता स्वीकारल्याचे दिसते. पंचेचाळीस वर्षांपूर्वी जनसंघाच्या कार्यकर्त्यांनी आणीबाणीच्या विरोधात लढा दिला. आजही आम्ही लोकशाहीच्या रक्षणासाठी संघर्ष करू.

आंदोलनात जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, जिल्हा चिटणीस, सुनील जाधव, युवा जिल्हाध्यक्ष निलेश नलावडे, सातारा शहर सरचिटणीस जयदीप ठुसे, विक्रांत भोसले, सातारा तालुका सरचिटणीस गणेश पालखे, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस स्वप्निल बोराटे, वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर उत्कर्ष रेपाळ, औद्योगिक आघाडी प्रदेश कार्य करिणी सदस्य अमोल सणस, जिल्हाध्यक्ष निलेश शहा, शहराध्यक्ष रोहित साने, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष डॉक्टर सचिन साळुंखे, मनीष महाडवाले, प्रशांत जोशी, सातारा शहर उपाध्यक्ष चंदन घोडके, तालुका उपाध्यक्ष नितीन कदम, सातारा शहर चिटणीस रवी आपटे, लखन चव्हाण, महिला मोर्चा अध्यक्ष रीना भणगे, उपाध्यक्ष वैष्णवी कदम युवा मोर्चा अध्यक्ष विक्रम बोराटे, ओबीसी तालुका अध्यक्ष विक्रम पवार, सन्मान आयाचित,बंडा पवार, किरण गोगावले, हेमंत शिंदे, अभिजीत जाधव, युवराज साबळे, राजेंद्र चव्हाण, महेश निकम कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!