दैनिक स्थैर्य । दि. १७ सप्टेंबर २०२१ । सातारा । महाराष्ट्रातील आघाडी, तिघाडी सरकार हे महिलांवर होणारे अत्याचार नुसतेच डोळे विस्फारून पहात आहे. परंतु, गुन्हेगारांवर कारवाई करताना घाबरत आहे. याचा निषेध करण्यासाठी सातार्यातील पोवई नाका येथे भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा सुवर्णाताई पाटील आणि महिला मोर्चा सातारा जिल्हाध्यक्षा डॉ सुरभी भोसले यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले.
संकटास घाबरून घरात बसलेल्या ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार सुरु आहेत. सरकारच्या दबावामुळे गुन्हेगारांवर कारवाई करण्याची पोलिसांची हिंमत राहिलेली नाही. त्यामुळे आता महिलांनाच आपल्या संरक्षणाची तयारी करावी लागणार आहे. घरकोंबडया सरकारमुळेच महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार वाढले आहेत. अशी टीका भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा सुवर्णाताई पाटील आणि महिला मोर्च्या जिल्हाध्यक्ष डॉ सुरभी चव्हाण यांनी केली. तसेच, अत्याचाराविरोधातील संघर्षास महिलांना बळ दे, असे साकडे सरकारी दडपशाहीमुळे बंद असलेल्या मंदिरासमोर जाऊन श्रीगणेशाच्या चरणी घालण्यात येणार असल्याची माहिती दिली.
महिलांचा सन्मान राखण्यासाठी केंद्र सरकार विविध योजना आखत आहे. महिलांना मंत्रिमंडळात मानाचे स्थान मिळत आहे. तर इकडे राज्यात मात्र ठाकरे सरकारच्या निष्क्रीयतेमुळे महिलांवर अत्याचारांचा कळस गाठला आहे. राज्यात गणेशात्सव सुरू होत असताना, अनेक कुटुंबं अत्याचारांच्या भयाने धास्तावली आहेत. त्यांना संरक्षण देण्यात ठाकरे सरकार कुचकामी ठरले आहे असा आरोप त्यांनी केला.
यावेळी भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सौ. सुवर्णाताई पाटील, महिला मोर्चा सातारा जिल्हाध्यक्ष डॉ. सुरभी भोसले, सातारा शहर महिला मोर्चा अध्यक्ष रीना भणगे, तालुकाध्यक्ष मोनाली पवार, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस मनीषा पांडे, जिल्हा उपाध्यक्ष निर्मला पाटील, जिल्हा चिटणीस सौ. सविता पवार, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुजाता कोल्हटकर, सातारा शहर उपाध्यक्ष वैशाली टंगसाळे, भटके विमुक्त आघाडी जिल्हा अध्यक्ष प्रिया नाईक, ओबीसी मोर्चा युवती जिल्हाध्यक्ष वनिता पवार आदी उपस्थित होते .