भाजपकडून ठाकरे सरकारची कोंडी, अखेर सचिन वाझेंची उचलबांगडी; हिरेन हत्या प्रकरणावरून विधान परिषद 4 वेळा तहकूब

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि.११: मनसुख हिरेन मृत्युप्रकरणी वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझे यांची गुन्हे शाखेतून उचलबांगडी करण्यात आली. वाझे यांना निलंबित करून अटक करा, अशी मागणी करून दोन दिवस विधिमंडळात रणकंदन करून भाजपने कोंडी केल्यानंतर ठाकरे सरकारचा नाइलाज झाला आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विधान परिषदेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाझे यांची अन्यत्र बदली करण्यात आल्याची घोषणा केली. तसेच हिरेन मृत्यू प्रकरणाचा एटीएस तपास करीत असून दोषी आढळल्यास कुणालाही पाठीशी घालणार नाही, असा शब्दही गृहमंत्र्यांनी बुधवारी विधान परिषदेत दिला. मात्र वाझे यांना अटक करण्याच्या मागणीसाठी भाजप सदस्यांनी घोषणाबाजी व गदारोळ करून चार वेळा विधान परिषदेत कामकाज बंद पाडले.

दरम्यान, अखेरच्या दिवशी अर्थसंकल्पावर चर्चा करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत थकीत वीज बिल, कोविड भ्रष्टाचाराचे मुद्दे उपस्थित करून आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. अर्थमंत्री अजित पवार यांनी आमदार निधीत १ कोटी रुपयांची वाढ करून तो ४ कोटी करण्यात अाल्याची घोषणा केली. तेव्हा सत्ताधाऱ्यांसह वाझे प्रकरणावरून सलग दोन दिवस सभागृहात टीकेची झोड उठवणाऱ्या विरोधकांनीही त्याचे स्वागत केले.

वाझेंना वकिलाची गरज नाही, मुख्यमंत्रीच त्यांचे वकील
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेनंतर विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही पत्रकारांना सामाेरे जाऊन आपली बाजू मांडली. राज्यात कायदा-सुव्यवस्था ढासळलेली अाहे. पाच बलात्काराचे स्थगन प्रस्ताव सभागृहात मांडले, पण काहीच निर्णय झालेले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने वाझेंबद्दल सांगितले, ते पाहता सचिन वाझेंना वकिलाची गरज नाही असेच दिसते, असा टाेला फडणवीस यांनी लगावला. एवढे पुरावे आल्यानंतरही त्यांना वाझेंचे संरक्षण करावे लागते यातून वाझे सरकार पाडू शकतात, चालवूही शकतात हेच दिसते. या सरकारचा कारभार तुघलकी असून विधानसभेत निर्णय घेण्यात सत्ताधारी उघडे पडले, असे फडणवीस म्हणाले.

कामकाज चालावे म्हणून वाझेंची बदली : अजित पवार
विधानसभेचे अधिवेशन हाेऊ देणार नाही, अशी भूमिका भाजपने घेतली हाेती. सभागृहाचे कामकाज चालावे म्हणून वाझे यांना बाजूला केल्याचे या वेळी अजित पवारांनी स्पष्ट केले. दरम्यान, विधानसभा अध्यक्षपद निवडीच्या मुद्द्यावर नाराज झालेल्या काँग्रेसचा एकही नेता पत्रकार परिषदेला उपस्थित नव्हता. याबाबत छेडले असता उपमुख्यमंत्री म्हणाले, काँग्रेस नाराज नाही. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र येऊन ठरवू त्याच दिवशी अध्यक्षाची निवड हाेईल, असे सांगून त्यांनी सारवासारव केली.

वाझे म्हणजे लादेन नव्हे, आधी फाशी, मग तपास हे कसे शक्य ? : मुख्यमंत्री
मुंबई | भाजप खासदार मोहन डेलकर यांची आत्महत्या, मनसुख हिरेन हत्या आदी प्रकरणांची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. मात्र हिरेन प्रकरणात भाजप अाततायीपणा करीत अाहे, ‘आधी फाशी, मग शिक्षा असे कसे हाेईल?’ असा सवाल उपस्थित करून वाझे म्हणजे ओसामा बिन लादेन असल्यासारखे ते वागत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच सचिन वाझे यांचा शिवसेनेशी थेट संबंध नाही, असे ते म्हणाले. अधिवेशन संपल्यावर विधान भवनातील हिरवळीवर मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. अडचणीच्या काळात अधिवेशनात जनतेला दिलासादायक निर्णय झाल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. काेविड परिस्थितीवर बोलताना लाॅकडाऊनची शक्यता नसल्याचे संकेत दिले. मात्र तशी परिस्थिती येऊ नये म्हणून जे करायचे ते अाम्ही करत अाहाेत. लाेकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

दोन गुन्हे , दोन तपास
अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके सापडणे आणि हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू असे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले अाहेत. स्फोटकांचा तपास एनआयए ही केंद्रीय तपास यंत्रणा करीत असून हिरेनच्या मृत्यूची महाराष्ट्र एटीएस चौकशी करीत आहे.

डेलकर आत्महत्या : प्रफुल्ल खेडा यांच्याविरोधात गुन्हा दाखल
दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांचा मुलगा अभिनव याच्या तक्रारीनुसार दादरा-नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल खेडा पटेल यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आणि दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री देशमुख यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!