दैनिक स्थैर्य । दि. २१ जुन २०२२ । फलटण । राज्यामध्ये माजी मुख्यमंत्री व आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात लवकरच भारतीय जनता पार्टीचे सरकार स्थापन होणार आहे. सध्या राज्यामध्ये असणारे महाविकास आघाडीचे सरकार हे लवकरच जाणार असून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यामध्ये पुन्हा भारतीय जनता पार्टीचे सरकार स्थापन होणार आहे. त्यामध्ये माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे बरेच सहकारी हे राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये असणार आहेत, असे मत भारतीय जनता पार्टीचे फलटण शहराध्यक्ष अमोल सस्ते यांनी व्यक्त केले.
राज्यामध्ये असलेले महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अंतर्गत बरेच मतभेत होते. आज ना उद्या ते बाहेत येणार होतेच ते नेमके शिवसेनेच्या माध्यमातून बाहेर आले. राज्यामध्ये मुख्यमंत्री जरी शिवसेनाचा झाला असला तरी शिवसेनेच्या मंत्र्यांना व आमदारांना सापत्नीक वागणूक राष्ट्रवादी व काँग्रेसच्या माध्यमातून नेहमीच मिळत आली आहे. शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याऐवजी शिवसेना प्रमुखच मुख्यमंत्री झाल्याने शिवसेनेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर धुसपूस सुरु होती व तीच धुसपूस नेमकी बाहेर आली आहे. आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी हि राज्यामध्ये लवकरच स्थिर सरकार स्थापन करेल व राज्याची रखडलेली विकासाची चाके पुन्हा मार्गस्थ करेल, असा विश्वास सुद्धा यावेळी सस्ते यांनी यावेळी व्यक्त केला.