स्थैर्य, मुंबई, दि.८: महाराष्ट्र प्रदेश भाजपची कार्यकारिणीची बैठक गुरुवारी पार पडणार आहे. दादरच्या वसंत स्मृती कार्यालयात सकाळी १० वाजता पदाधिका-यांच्या बैठकीसह कार्यकरिणीला सुरुवात होईल. त्यानंतर दुपारी कार्यसमितीची बैठक होणार आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा असलेले एकनाथ खडसे कार्यकारिणीला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारिणी बैठक होणार असून बैठकीत राज्याच्या राजकीय परिस्थितीसोबत महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांबाबत चर्चा करण्यात येईल. शेतकरी व कामगारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केलेल्या कायद्यातील सुधारणांबाबत बैठकीत ठराव संमत करण्यात येतील. कोरोनामुळे कार्यसमितीची बैठक व्हर्चुअल स्वरुपात होईल व राज्यातून ठिकठिकाणाहून कार्यसमिती सदस्य बैठकीत ऑनलाईन सहभागी होतील.
बैठकीचे उद्घाटन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या मार्गदर्शनाने होईल. ते दिल्ली येथून ऑनलाईन सहभागी होतील. बैठकीचा समारोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करतील. कार्यसमिती बैठकीपूर्वी नवनियुक्त प्रदेश पदाधिका-यांची बैठक होईल. या बैठकीचे उद्घाटनपर भाषण पक्षाचे राष्ट्रीय संघटनमंत्री बी.एल. संतोष करतील. पदाधिकारी बैठकीचा समारोप राष्ट्रीय सहसंघटन मंत्री व्ही. सतीश यांच्या मार्गदर्शनाने होईल.
या बैठकीत मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी ठराव मांडण्यात येईल. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या बेपर्वाईमुळे मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली असून त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करण्यात येईल. राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असून त्याबाबत ठराव मांडण्यात येईल. महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रियतेमुळे व गोंधळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार राजकीय ठरावात करण्यात येईल. तसेच शेती क्षेत्रात सुधारणा करणारे कायदे मोदी सरकारने नुकतेच केले आहे. कामगार कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे. याविषयी ठराव मांडून मोदी सरकारचे अभिनंदन करण्यात येईल. प्रदेश कार्यसमिती बैठकीत पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकारीपदी नियुक्त झालेल्या विनोद तावडे, पंकजा मुंडे, विजया रहाटकर व सुनील देवधर या नेत्यांचा सत्कार करण्यात येईल.