स्थैर्य, सोलापूर, दि. 30 : सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना पुण्याच्या सांगवी येथील एका फसवणुकीच्या गुन्ह्यात शुक्रवारी पोलिसांनी अटक केली. काळे महापालिकेतील सत्ताधारी भाजपाचे लोकप्रतिनिधी आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सांगवी पोलीस ठाण्यात उपमहामौर राजेश दिलीप काळे (रा. जुळे सोलापूर) यांच्या विरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
काळे व त्यांच्या अन्य साथीदारांनी सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक सदनिका (फ्लॅट) अनेकांना विकून आर्थिक फसवणूक केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी आज सायंकाळी सोलापुरात येऊन येथील विजापूर नाका पोलिसांच्या मदतीने उपमहापौर राजेश काळे यांना अटक केली. काल रात्री त्यांना पिंपरी-चिंचवडमध्ये आणले गेले. काळे यांची पुढील चौकशी सुरू असून त्यानंतर त्यांना निगडी पोलिसांच्या ताब्यात दिलं जाणार आहे.
राजेश काळे यांचे वडील पिंपरी-चिंचवडमध्ये नोकरी करीत होते. त्यावेळी ते पिंपरी चिंचवडमध्ये राहत होते. २००२ मध्ये पिंपळे निळख येथील औदुंबर सोसायटीत त्यांनी एक फ्लॅट खरेदी केला. या फ्लॅटची बोगस कागदपत्रे तयार करून हा फ्लॅट पाच जणांना विकला होता. या प्रकरणी २००७ साली निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्यावर्षी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली होती. चौकशी पूर्ण झाल्यानंतर काळे यांना पोलिसांनी अटक केली.
फसवणुकीचा हा प्रकार घडण्याच्यावेली काळे पिंपरी चिंचवडमध्ये राहायला होते. कालांतराने पिंपरी-चिंचवड सोडून ते सोलापूरला स्थायिक झाले. तिथं ते राहत असलेली महापालिकेची जागा राखीव झाल्यामुळं ते निवडणुकीला उभे राहिले. त्यातच उपमहापौर पदही राखीव झाले आणि काळे यांना उपमहापौरपदाची संधी मिळाली होती.